पोलीस म्हटला की सर्वसामान्यांना एक प्रकारे वचक असतोच. पोलिसांची उलटतपासणी सहसा कुणी करीत नाही. व्यापारीवर्गही पोलिसांना दचकून असतो. त्याचाच फायदा उचलत ठकसेनांनी पोलीस असल्याची बतावणी करीत सराफांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. जबरी चोरीविरोधी पथकाने सराफांना पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या एका अवलिया ठकसेनास अटक केली आहे. त्याने तब्बल १८ सराफांना हातोहात फसवले होते. मागील वर्षीही नकली पोलिसांनी सराफांना पोलीस असल्याची बतावणी करीत ६ कोटी रुपयांचे हिरे पळवले होते.
अकील असगर अली सय्यद (४०) असे या ठकसेनाचे नाव आहे. जोगेश्वरीच्या मराठमोळ्या वस्तीत राहत असल्याने तो मराठी उत्तम बोलतो. उंचीपुरी शरीरयष्टी आणि मजबूत होती. आपल्याला मराठी येते पोलिसांसारखे दिसतो, मग याचा फायदा का उचलू नये, असा विचार त्याने केला आणि त्याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघाली. त्याने आपला मोर्चा सराफांकडे वळवला. तो उपनगरातल्या एखाद्या सराफाच्या दुकानात जायचा. या वेळी तो अगदी साधे कपडे घालायचा. कधी कधी चक्की लुंगी घालायचा. मी पोलीस निरीक्षक असून नुकताच जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यात बदली होऊन आलोय असे सांगायचा. सध्या मी पोलीस ठाण्यातच राहतो, असे सांगून काही अधिकाऱ्यांची नावे सांगायचा. त्या सराफाला तो खरोखरच पोलीस असल्याचे वाटायचे. गप्पा करीत तो सहज खरेदी करायचा. दुकानातील दागिन्यांचे कौतुक करीत लाखभर रुपयांचे दागिने खरेदी करायचा आणि फक्त पाच ते दहा हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून द्यायचा. मी तर सहज चक्कर टाकायला आलो म्हणून पैसे आणले नाहीत, उरलेले पैसे मी घरी गेल्यावर देतो, असे सांगून हळूच तेथून सटकायचा. पोलीस आहे म्हटल्यावर त्या सराफांना संशय येत नसे.
सराफांना गंडविण्याची त्याची आणखी एक पद्धत होती. तो सकाळी बाहेर पडायचा आणि नाक्यावर जे कामगार उभे असतात (नाका कामगार) त्यांना आपल्या घरी कामासाठी घेऊन यायचा. वाटेत थोडे काम आहे, असे सांगून त्या कामगाराला घेऊन सराफाच्या दुकानात जायचा. तेथे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी पोलीस आहे, नुकताच बदली होऊन आलोय अशी थाप मारायचा आणि लाखभर रुपयांचे दागिने खरेदी करायचा. या वेळीही तो पाच-दहा हजार रुपये सराफांच्या हाती टेकवायचा. माझा नोकर मी दुकानात ठेवतो आणि पैसे घेऊन येतो, असे सांगत त्या कामगाराकडे बोट दाखवायचा. सराफाचा विश्वास बसायचा. बऱ्याच वेळाने आपली फसगत झाल्याचे सराफाच्या लक्षात यायचे. त्या कामगारालाही नाहक त्रास सहन करावा लागायचा.
जबरी चोरी आणि दरोडाविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक फडतरे यांना अकील सय्यदबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून अकीलला अटक केली.