सी लिंक, पालिकेचे पार्किंग तळ, तसेच टोल नाक्याचे बनावट पासेस विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट पावती पुस्तके, चलन आदी मिळून सुमारे २८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
जगदंबाप्रसाद मिश्रा (४०) आणि सोमनाथ माझी (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मालमत्ता शाखेच्या अधिकाऱ्यांना जगदंबा प्रसाद मिश्रा हा कुलाबा येथे सी लिंकचे पासेस विकत असल्याची माहिती मिळाली. वास्तविक, टोल पावत्या किंवा पार्किगच्या पावत्या त्या त्या ठिकाणीच विकल्या जातात. त्यामुळे पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून मिश्राला बनावट पावत्या विकताना अटक केली. त्याच्याकडून सी लिंकचे एका दिवसाच्या परतीचे ११ हजार पासेस, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगचा परवाना असलेल्या जेव्हीके कंपनीचे ९००० पार्किंग चलन, पालिकेच्या पार्किंगची वाजवीपेक्षा जास्त दराची १४ पुस्तके, ठाणे-भिवंडी बायपास रोडच्या टोलचे २०० चलनाचे १ पुस्तक, गोरेगावच्या आरे डेअरीच्या रस्ते वापराचे १०० चलनाचे १ पुस्तक असा ऐवज जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे २८ लाख एवढी आहे.
याबाबत माहिती देतांना गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले की, टूरिस्ट आणि खाजगी वाहनांच्या चालकोंना कमी किंमतीत या टोल आणि पार्किंगच्या पावत्या विकल्या जात होत्या. हे वाहन चालक त्या खोटय़ा पावत्या दाखवून आपल्या मालकांकडून पूर्ण रक्कम घ्यायचे. हा प्रकार सुमारे दीड वर्षांपासून सुरू होता. या प्रकारे या दोघांनी कोटय़वधींचे नुकसान घडवून आणले आहे.
 सोमनाथ माझी हा दुसरा आरोपी बनावट पावत्या आणि पुस्तके फोर्ट येथे छापत होता. त्यालाही मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी जगदंबा प्रसाद मिश्रा हा कुलाबा येथे ‘ए ए ऑक्शनरीज अॅण्ड कॉन्टॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड’ हा ठेका चालवायचा. पालिकेचे अथवा टोल नाक्याचे कुणी यात सहभागी आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.