कचऱ्याचे लीलया विलगीकरण करणारा रोबो, आगीपासून संरक्षण करणारा रोबो, गोदामांमधील सामानाचे व्यवस्थापन सांभाळणारा रोबो हे मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मध्ये भरणाऱ्या ‘ई-यंत्र रोबोटिक्स’च्या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे.
ई-यंत्रच्या ‘ईवायआरसी-२०१४’ची अंतिम फेरी आयआयटीच्या पवई येथील संकुलात २७ आणि २८ मार्च रोजी रंगणार आहे. या दोन दिवसांच्या स्पर्धेत देशभरातील ३३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चमू सहभागी होणार आहेत. ‘शहरांशी संबंधित सेवा’ हा यंदाच्या ई-यंत्र स्पर्धेचा विषय होता. त्यात शहरांमधील संबंधित विविध समस्यांची हाताळणी करणारे रोबो तयार करणे विद्यार्थ्यांसमोरील आव्हान होते. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या आयआयटी उन्हाळी सुट्टीत इटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यात आगीपासून संरक्षण, कचऱ्याचे विलगीकरण, गोदाम व्यवस्थापन, कागरे अलाइन्मेंट, कागरे सॉर्टिग अशा विविध विषयांची हाताळणी विद्यार्थ्यांनी केली होती.
विद्यार्थ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जाणीवजागृती करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. त्यात त्यांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांचे आकलन करून त्यांच्यावर तंत्रज्ञानाच्या आधारे तोडगा सुचविण्याचे आव्हान पेलायचे असे. केंद्र सरकारच्या मानव विकास विभागातर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
आधुनिक तंत्रज्ञानाची हाताळणी करू देणाऱ्या प्रात्यक्षिकाच्या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या संभाषणचातुर्याची कसोटीही यात पाहिली जाते. आयआयटीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.