शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ई-ग्रंथालयाची इमारत बांधून पूर्ण झाली असून त्यासाठी लागणारे फर्निचर आणि संगणीकरणासाठी ८ कोटी ७७ लाख रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास वैद्यकीय शिक्षण संचालकांनी मंजुरी प्रदान केली असली तरी मंत्रिमंडळाने अद्यापपर्यंत मंजुरी दिली नसल्याची माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मेडिकलच्या हीरक महोत्सवानिमित्त २००६ मध्ये आयोजित समारंभात तत्कालीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ई-ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा केली होती. दोन वर्षांनंतर १० ऑक्टोबर २००८ रोजी राज्य सरकारने ४ कोटी २० लाख रुपये मंजूर केले. यानंतर ग्रंथालयाच्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. सुरुवातीला २ हजार ७९९ वर्ग मीटर क्षेत्रात ग्रंथालयाची इमारत बांधावी, असे ठरले. परंतु क्षेत्रफळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर २०११ मध्ये या इमारतीच्या बांधकामाचे क्षेत्रफळ २ हजार ७९९ वर्ग मीटरवरून ४ हजार १०६ वर्ग मीटर करण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला.
क्षेत्रफळ वाढल्याने खर्चही वाढणार होता. त्यामुळे अतिरिक्त खर्चास मंजुरी द्यावी, हा प्रस्तावही पाठवण्यात आला. या दोन्ही प्रस्तावास शासनाने मंजुरी प्रदान केली. परंतु त्यात बराच कालावधी निघून गेला. या ई-ग्रंथालयाच्या इमारतीसाठी एकूण ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या इमारतीचे उद्घाटन नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी फर्निचर व संगणकीकरणासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचनाही पवार यांनी केली. त्यानुसार लगेचच फर्निचरसाठी ६ कोटी ६९ लाख व संगणकीकरणासाठी २ कोटी ०८ लाख असा एकूण ८ कोटी ७७ लाखाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे पाठवण्यात आला. त्यांनी मंजुरी प्रदान करून हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला.
या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नसली तरी लवकरच ती मिळेल, असा विश्वास डॉ. पोवार यांनी व्यक्त केला.
ही मंजुरी मिळताच फर्निचर व संगणीकरणाच्या कामास सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.