उपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात, अशी काहीशी परिस्थिती आहे. याला कारणीभूत आहे बेस्टचा वीजपुरवठा! नळ बाजार, निजाम स्ट्रीट आदी परिसरातील रहिवाशांची झोप सध्या भल्या पहाटेच मोडते ती वीजपुरवठा खंडित झाल्याने. गेले दोन-चार महिने जवळपास दर दिवशी या भागातील वीजपुरवठा पहाटे चारच्या सुमारास खंडित होत असून पुरवठा सुरळीत होण्यासाठी चार तासांचा अवधी लागत आहे. नेमक्या याच वेळात पाणी येत असल्याने विजेअभावी पाणी इमारतींच्या टाक्यांमध्येही चढत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना सध्या विजेच्या तुटवडय़ासह पाणीबाणीलाही तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत बेस्टच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता उद्धट उत्तरे ऐकावी लागत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.दक्षिण मुंबई हा साधारणपणे सर्वच बाबतीत समृद्ध भाग मानला जातो. मात्र गेल्या चार महिन्यांपासून दक्षिण मुंबईतील नळ बाजार, निजाम स्ट्रीट आदी परिसरात जवळपास दर दिवशी पहाटे चारला वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत बेस्ट समितीच्या बठकीत येथील लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्य याकूब मेमन यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी तक्रार करण्यासाठी बेस्टच्या तक्रार निवारण कक्षाशी अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता, ‘समिती सदस्यच काय, महाव्यवस्थापकांकडे तक्रार केलीत, तरीही वीजपुरवठा सुरळीत होणार नाही,’ अशी उद्धट उत्तरे रहिवाशांना ऐकावी लागत आहेत. पहाटे या परिसरातील अनेक रहिवासी धंदेवाईक असल्याने पहाटे चारपासूनच त्यांचा दिनक्रम सुरू होतो. पहाटे पाचच्या सुमारास पाणी येते. मात्र ते पाणी इमारतीवरील टाकीत चढवण्यासाठी पंपच चालू नसल्याने दिवसभर पाण्याचे हाल होत आहेत. अशीच समस्या दोन वर्षांपूर्वी उद्भवली असता आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून विजेची आणखी एक जोडणी घेतली होती, असे मेमन यांनी सांगितले. या परिसरात उभ्या राहिलेल्या एका टॉवरमुळे येथील विजेचा वापर वाढला आहे. बेस्टच्या नियमाप्रमाणे टॉवर उभारल्यानंतर तेथे बेस्टच्या सब-स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र या विकासकाने सब- स्टेशन बांधून दिलेले नाही. बेस्टने या विकासकाला दोन वर्षांची मुदत दिली होती. मात्र मुदत देऊन तीन वष्रे उलटली, तरी प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे येथील लोकांचे हाल होत आहेत. बेस्टने याबाबत १५ दिवसांत कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत केला नाही, तर १६व्या दिवशी येथील रहिवाशांना घेऊन आपण बेस्ट भवनात महाव्यवस्थापकांसमोर धरणे आंदोलन करू, असा इशाराही मेमन यांनी दिला आहे. याबाबत योग्य चौकशी करून प्रकरण निकालात काढले जाईल. तसेच नियंत्रण कक्षातून उद्धट उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन बेस्टचे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) आर. आर. देशपांडे यांनी दिले.