प्लास्टिक आणि कचराच केवळ नद्यांच्या प्रदूषणासाठी कारणीभूत नाही, तर अंत्यविधीची राखसुद्धा या प्रदूषणात आणखी भर घालत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. एकटय़ा नागपूर शहरात अंत्यविधीतून तयार होणारी सुमारे २ हजार ४५० किलो राख कन्हान नदीच्या प्रदूषणासाठी तेवढीच कारणीभूत ठरली आहे. हीच राख शहराच्या हिरवळीत भर घालून पर्यावरणाचे संतुलन कायम राखू शकते. यासंदर्भात आता इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनने पाऊल उचलली असून, नागपुरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.
माणसाच्या मृत्यूनंतर त्याला मोक्ष लाभावा म्हणून आप्तेष्ठ त्या नश्वर देहाचा अंत्यविधी धार्मिक विधीनुसार पार पाडतात. लाकडावर पार पडणाऱ्या एका अंत्यविधीनंतर ३५ ते ४० टक्के राख तयार होते. वास्तविक कोणत्याच धर्मात मृताला अग्नी लाकडावरच दिला जावा, असे लिखित नाही. या ७० मृतदेहांतून २ हजार ४५० किलो राख दररोज नागपुरात तयार होते. मानवी शरीरात ८५ टक्के पाणी आणि बारा ते साडेबारा टक्के कार्बन व इतर घटक तसेच दोन ते अडीच किलो हाडे असतात. त्यामुळे मृतदेह जाळल्यानंतर तयार होणारी राख ही लाकडांचीच असते. लाकडाच्या अंत्यविधीत ३५ ते ४० किलो राख, हाच अंत्यविधी एलपीजी विद्युत दाहिनीत केल्यास शून्य टक्के राख आणि गोवरीवर पार पाडल्यास २५ किलो राख तयार होते. या सर्व प्रक्रियेत हाडांचे वजन केवळ दोन ते अडीच किलोच्या दरम्यान असते. मात्र, नागपुरात दररोज पार पडणाऱ्या सुमारे १०० अंत्यविधीपैकी ७० अंत्यविधी लाकडावर, २५ अंत्यविधी एलपीजी विद्युत दाहिनीवर आणि केवळ ५ अंत्यविधी गोवरीवर केले जातात. यातून तयार होणारी राख मृतांचे आप्तेष्ट नदीत विसर्जित करून येतात. आप्तेष्टांनी ही राख नेली नाही तर घाटावरची मंडळी ती गोळा करून नदीच्या पात्रात सोडतात. मात्र, इतक्या मोठय़ा प्रमाणावर राख नद्यांमध्ये विसर्जित केल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.

राखेचा असाही वापर
प्रत्येक शहरात रोपवाटिका आहेत आणि येथे बियांपासून नवीन रोपे तयार केली जातात. त्यांच्यासाठी ही राख एक उत्तम खत म्हणून पर्याय ठरू शकतो. यामुळे एका झाडाच्या रूपात ती व्यक्ती आपल्यासमोर प्रकट होऊ शकते. या कृतीला लोकांचे सहकार्य मिळाले तर दहन घाटावर मोठे कलश ठेवून सर्व राख त्यात गोळा करून जवळच्या रोपवाटिकेला देता येईल. यातून उत्तम खत तर मिळेलच, पण नद्यांचे प्रदूषणसुद्धा वाचेल. इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनने गेल्या वर्षांपासून ही मोहीम हाती घेतली असून नागपुरातील निसर्गप्रेमी जनतेची त्याला हळूहळू का होईना, साथ मिळायला लागली आहे.