परंपरेला फाटा
लाकडे वापरून केल्या जाणाऱ्या परंपरागत अंत्यसंस्कारांना फाटा देत पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याकडे नागपूरकरांचा कल वाढत असून अंत्यविधीसाठी एलपीजी व गोवरी साधनांचा वापर करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. २०१४ मध्ये सुमारे १६० अंत्यसंस्कार एलपीजी वापरून तर गेल्या तीन महिन्यांत २० अंत्यसंस्कार गोवरीच्या साहाय्याने करण्यात आले आहेत.
हिंदू समाजात अंत्यविधीसाठी प्रामुख्याने लाकडाचा वापर केला जातो. तो टाळून एलपीजी किंवा गोवरी वापरून हे अंत्यविधी व्हावे यासाठी विजय लिमये व त्यांची ‘इकोफ्रेंडली लिवींग फाऊंडेशन’ ही संस्था नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सातत्याने करीत आहे. लिमयेंच्या प्रयत्नातून व नागपूर महापालिकेच्या सहकार्याने अंबाझरी घाटावर गॅस दाहिनीदेखील सुरू करण्यात आली असून हळूहळू त्याचा वापर करण्याकडे नागपूरकरांचा कल वाढू लागला आहे. परंपरागत अंत्यविधीसाठी १५ ते १८ वर्षांच्या दोन झाडांपासून मिळेल इतकी लाकडे जाळली जातात. त्यामानाने या कामासाठी लागणाऱ्या एलपीजीचे प्रमाण फारच कमी असते आणि त्याद्वारे प्रदूषणालाही मोठय़ा प्रमाणात आळा घालता येतो. हे प्रदूषण टाळण्याबाबत लोकांची मानसिकता आता तयार होऊ लागली असून अंत्यसंस्कारासाठी एलपीजीला प्राधान्य देण्याची मानसिकता मूळ धरू लागली आहे. गॅस दाहिनीच्या परिसरात स्वच्छता ठेवल्या जाऊ लागल्यामुळेही गेल्या वर्षभरात गॅस दाहिनीचा वापर करून अंत्यविधी करणाऱ्यांची संख्याा वाढू लागली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१३ या दरम्यान केवळ ३८ अंत्यसंस्कारांसाठी गॅस दाहिनीचा पर्याय वापरण्यात आला होता. मात्र, यावर्षी ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून ऑक्टोबरअखेपर्यंत १६० जणांचे अंत्यसंस्कार एलपीजी दाहिनीद्वारे करण्यात आले.
अर्थात, तुलनेने कर्मठ असणाऱ्यांना आजही गॅस दाहिनीची संकल्पना पचनी पडलेली नाही. अशा लोकांनी गोवरीचा वापर दाहसंस्कारांसाठी करावा या दृष्टीने लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘गेल्या तीन महिन्यांत अंबाझरी घाटावर २० अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एका अंत्यविधीसाठी जवळपास ६०० गोवऱ्यांची आवश्यकता असते. नागपूर आणि परिसरात केवळ गोव-या वापरून अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण वाढले तर पशुपालन करणा-या अनेकांना अतिरिक्त रोजगार या माध्यमातून मिळणार आहे. गायी-म्हशींचे शेण सध्या नाल्यांमध्ये फेकले जाते. गोव-यांचा वापर वाढल्यास हा प्रकार कमी होऊन पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण होण्याला आळा बसेल,’ असे मत लिमये यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने आपला अंत्यसंस्कार एलपीजी वा गोवरी वापरूनच व्हावा, असे अगोदरच लिहून ठेवावे व प्रदूषणाला व वृक्षतोडीला आळा घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.