रिक्षाचालक आणि इकोव्हॅनचालकांमधील संर्घषाची झळ नेहमीच प्रवाशांना सहन करावी लागत आहे. तीन दिवसांपूर्वी एका इकोव्हॅनचालकाने खारघरजवळ रिक्षाचालकाला मारहाण केल्याने या संघर्षांत वादाची नवी ठिंणगी पडली असून या विरोधात रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागावर मोर्चा नेल्याने प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी इकोव्हॅनसेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे मात्र प्रवाशांना पायपीट करण्याची वेळ आली आहे. या भांडणामध्ये स्थानिक आणि उपऱ्या हा मुद्दा प्रामुख्याने कळीचा ठरत आहे.
खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी तसेच कामोठे ते बेलापूर या पल्ल्यावर धावणाऱ्या इकोव्हॅन गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. यामुळे तळोजा, रोडपाली, ओवेगाव व खारघर वसाहत या परिसरात बससेवा नाही अशा ठिकाणच्या प्रवाशांवर पायपीट करण्याशिवाय किंवा रिक्षाचालकांना त्यांच्या मागणीनुसार भाडे देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दररोज शेकडो प्रवासी या इकोव्हॅनने प्रवास करतात. या मार्गावर बससेवा सुरू नसल्याने इकोव्हॅनव्यतिरिक्त या प्रवाशांना प्रवासाचा अन्य कोणताही पर्याय नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी खारघर येथे तीन आसनी रिक्षाचालक व इकोव्हॅनचालकांमध्ये वैयक्तिक वाद उफाळून आल्याने संतप्त रिक्षाचालकांच्या संघटनेने वसाहतीमधील सर्व रिक्षा बंद करून वाहतूक विभाग कार्यालयात धाव घेतली. इकोव्हॅनला प्रवासी वाहतुकीची परवागनी नसताना बेकायदेशीररीत्या व्यवसाय करून स्थानिक रिक्षाचालकांवर सुरू असलेली दादागिरी का खपवून घ्यायची, असा प्रश्न यावेळी वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना रिक्षाचालकांनी विचारला. यावेळी पोलिसांवर हफ्तेखोरीचा आरोप झाला. त्यामुळे संतप्त पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून इकोव्हॅनची प्रवासी वाहतूक बंद केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकोव्हॅनचालकांनी बैठक बोलावून स्थानिक तीनआसनी रिक्षाचालकांशी समेट घडविला. मात्र त्याचबरोबर स्थानिक (भूमिपुत्र) मालक नसलेल्या इकोव्हॅन खारघर रेल्वे स्थानकाबाहेर व्यवसाय करू शकत नाहीत असा अलिखित फतवा काढला. त्यामुळे शुल्लक मारहाणीतून सुरुवात झालेल्या वादाला स्थानिक व उपऱ्यांचा रंग चढला. आजही खारघर रेल्वे स्थानकाबाहेर बोटांवर मोजण्याइतक्याच इकोव्हॅन आहेत.
या सर्व घटनेमुळे प्रवासी भरडले जात आहेत. सात प्रवासी आल्याशिवाय इकोव्हॅन हलणार नाही. स्टूलवर बसून डीकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी आता बेकायदा इकोव्हॅनही राहिल्या नाहीत. पनवेलच्या मतदारांच्या यादीत सर्वाधिक संख्या ही प्रवासीवर्गाची आहे. हेच प्रवासी पनवेलचे आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायतीमधील सदस्य निवडून देतात. गेल्या चार दिवसांपासून याच प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. मात्र कोणताही राजकीय नेता निवडणुकीचे वातावरण नसल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसते.