लेडीज बारमध्ये काम करणाऱ्या बारबालाच्या नादात पती गुंतल्याने एका उच्चशिक्षित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील पळस्पे गावच्या माजी सरपंचाच्या घरात मंगळवारी पहाटे घडली. मृत महिलेचे नाव अपर्णा भोईर असे आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अपर्णाचा पती सूरज याला अटक केली आहे.
अपर्णाचे शिक्षण एम.फीलपर्यंतचे आहे. सात वर्षांपूर्वी पदवीचे शिक्षण घेत असताना देवळोली गावातील अपर्णा पाटील आणि पळस्पे गावातील सूरज भोईर यांचा प्रेमविवाह झाला. अपर्णाला पाच वर्षांची एक मुलगी आणि चार महिन्यांचा एक मुलगा आहे. सूरज हा सधन घरातील असल्याने त्याला वाशी व चेंबूर येथील लेडीज बारमध्ये जाण्याची सवय होती.
हल्ली तो एका बारबालेच्या प्रेमात पडला होता. सोमवारी त्याने अपर्णा व त्या बारबालेची मुलाखत करून दिली. याचाच राग आल्याने अपर्णाने आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी पहाटे अपर्णाने तिच्या शयनकक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली. अपर्णाच्या आई लीलावती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सूरजला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या तक्रारीत सूरज हा अपर्णाला सुरुवातीपासून मारहाण करायचा असे म्हटले आहे. अपर्णाला सोमवारी रात्री सूरजने मारहाण केल्याचे अपर्णाच्या पाच वर्षांची मुलगी सिमरन हिने पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनाच्या अहवालात अपर्णाच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत.
विक्रेत्याने गळफास घेतला
कामोठे वसाहतीमध्ये राहणारे व लॉटरी विक्रेते उमेश कदम यांनी स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सेक्टर २१ मधील ‘चंद्रदर्शन हाइट’ या इमारतीमध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली.
उमेश कदम यांची पत्नी वैशाली यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात उमेश यांचे लॉटरी व्यवसायामुळे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.