ठाणे आणि पालघर अशा दोन्ही जिल्ह्य़ांमधील २४ पैकी किमान १५ जागांवर विजय मिळवू अशा बाता मारत मन मानेल त्या पद्धतीने उमेदवारांची केलेली निवड शिवसेनेसाठी आत्मघातकी ठरली असून संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्य़ातील चढत्या राजकीय आलेखाला या पराभवामुळे उतरंड लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या पट्टय़ात उमेदवारांची निवड करताना शिंदे यांचा शब्द ‘मातोश्री’वर प्रमाण मानला गेला. ठाणे शहरासारख्या पक्षासाठी सुरक्षित मतदारसंघात नारायण राणे यांच्या गोटातून शिवसेनेत परतलेले रवींद्र फाटक यांना उमेदवारी देताना शिंदे यांनीच वजन खर्ची घातले. मात्र, शिवसेना-भाजपच्या स्थानिक राजकारणात एरवी कस्पटासमान लेखल्या गेलेल्या कमळाबाईने शिवसेनेच्या वाघाला यंदा जेरीस आणल्याने जिल्ह्य़ातील राजकारणातील शिंदेशाहीला मोठा धक्का बसला आहे.
वर्षांनुवर्षे निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलत काल-परवा पक्षात आलेल्या आयारामांना उमेदवारी बहाल करण्यात आल्यामुळे शिवसेनेत सुरुवातीपासूनच नाराजी होती. उमेदवारांची यादी जाहीर होताच शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बंडाचा भगवा हाती घेतला होता. ठाणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरुवातीपासून सुरक्षित मानला जात होता. त्यामुळे येथून कुणीही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल या भ्रमात शिवसेनेचे नेते होते. या मतदारसंघातून महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के, अनंत तरे यांसारखे उमेदवार इच्छुक होते. असे असताना ऐनवेळी पक्षात आलेले रवींद्र फाटक यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एके काळचे कट्टर समर्थक फाटक यांना पक्षात घेण्यावरून शिवसेनेच्या एका मोठय़ा गटात नाराजी होती. मात्र, महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी मांडवलीचे राजकारण करण्यात नेहमीच धन्यता मानणाऱ्या स्थानिक नेत्यांनी फाटक यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला. पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देण्यात आली. ठाण्यातील शिवसेनेच्या परंपरागत मतदारांना हे अजिबात रुचले नाही. फाटक यांना उमेदवारी मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांचा हट्ट होता. पक्षासाठी अस्मितेच्या मानल्या जाणाऱ्या ठाण्यासारख्या मतदारसंघात फाटकांच्या नावाने खेळलेला जुगार शिंदे यांच्या अंगलट आला.
भोईर जिंकले..कल्याण पट्टीत मात्र पराभव
लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले होते. या मताधिक्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा मोठा वाटा असला तरी कल्याण पट्टी ही पूर्वीपासूनच शिवसेनेचा गड मानला जातो. या ठिकाणी योग्य उमेदवारांची निवड केली गेल्यास शिवसेनेला चांगल्या जागा मिळतील असा अनेकांचा होरा होता. मात्र, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रमेश सुकऱ्या म्हात्रे या निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून एकनाथ िशदे यांनी सुभाष भोईर यांना उमेदवारी बहाल केली. नाराज म्हात्रे भाजपच्या दिशेने निघाले, मात्र त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र, या नाराजी नाटय़ाचा प्रतिकूल परिणाम शिवसेनेच्या परंपरागत मतदारांवर झाला. म्हात्रे यांच्या माघारीमुळे या मतदारसंघात भाजपला उमेदवार सापडला नाही. त्याचा फायदा भोईरांना मिळाला आणि मनसेच्या स्थानिक उमेदवाराविरोधात असलेल्या नाराजीमुळे ते मोठय़ा मताधिक्याने निवडूनही आले. मात्र, डोंबिवली, कल्याण (पूर्व), कल्याण (पश्चिम) या शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघात मात्र पक्षाला फटका सहन करावा लागला. कल्याण पूर्व मतदारसंघात अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना शिवसेनेत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. मात्र, पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांच्या विरोधामुळे हे प्रयत्न निष्फळ ठरले. तेथे ठाण्याहून आयात करून गोपाळ लांडगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. मात्र, अपक्ष गायकवाड यांनी लांडगे यांचा निसटत्या मतांनी पराभव केला आणि इथल्या हक्काच्या जागेवर सेनेला पाणी सोडावे लागले.  
भाजपची मुसंडी
ठाणे महापालिका हद्दीत येणारे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. यापैकी ठाण्याचा गड शिवसेनेने गमावला असला तरी कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा या मतदारसंघातही भाजप उमेदवारांनी चांगली मते घेतली. ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजपने अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांना उमेदवारी दिली होती. काल-परवापर्यंत पांडे हे नाव कुणाच्या गावीही नव्हते. प्रचारातही ते फारसे कुणाला दिसले नाही. असे असताना मतदानाच्या १४ व्या फेरीपर्यंत त्यांनी सरनाईक यांच्यावर आघाडी घेतली होती. सुमारे ५८ हजार मते घेताना त्यांनी सरनाईक यांना विजयासाठी झुंजविले. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातही एकनाथ शिंदे यांच्यासमोर संदीप लेले या भाजप उमेदवाराने तब्बल ५० हजार मते घेतली. भाजपने सेनेच्या परंपरागत मतांना सुरुंग लावल्याचे  स्पष्ट झाले आहे.