प्रचार रॅली, पत्रकांचे वाटप, होर्डिग्स, रिक्षातून केल्या जाणाऱ्या उद्घोषणा, चौक सभा, मोटारसायकल रॅली, स्क्रीन प्रचार, गृहभेटी अशा प्रचाराचा धुरळा शिगेला पोहोचला असून प्रचाराचा खर्च आयोगाच्या मर्यादेमध्ये बसवताना उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी लोकसभा मतदारसंघांचा आवाका आणि महागाई लक्षात घेता ती अतिशय अपुरी आहे. त्यात येनकेनप्रकारेण निवडून येण्यासाठी उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करीत असून त्याचा हिशेब निवडणूक आयोगाला देताना उमेदवारांच्या आर्थिक सल्लागारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाण्यातील उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च दहा लाखांच्या आत दाखविला आहे. प्रचारातील पैसा दिसू नये म्हणून हात आखडते घेणाऱ्या उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
ठाण्यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना खर्च सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. निवडणूक खर्चाची पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी, दुसरी तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात आली. तिसरी तपासणी मंगळवारी २२ एप्रिल रोजी होणार आहे. पहिल्या तपासणीमध्ये उमेदवारांनी दिलेली माहिती निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाण्यातील महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी पहिल्या टप्प्यात ७ लाख ९३ हजार ६५५ रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांनी ३ लाख ३४ हजार १७८ रुपये, आपचे संजीव साने यांनी ३ लाख ६५ हजार ३१५ हजारांचा खर्च दिला आहे. मनसेचे अभिजित पानसे यांनी ५ लाखांचा खर्च सादर केला आहे. धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे यांनी २ लाख ७४ हजारांचा खर्च पहिल्या टप्प्यात आयोगाकडे सादर केला आहे. झेंडे, रिक्षा भाडे, पेट्रोल, वाहने, पाण्याच्या बाटल्या, वातानुकूलित वाहन, वडापाव, नाष्टा, लंच, मोटारसायकल, मिरवणूक खर्च, सभागृह भाडे, स्टेशनरी, साऊंड सिस्टीम, जनरेटर अशा सर्व प्रकारच्या खर्चाचा यामध्ये समावेश उमेदवारांनी केला आहे.
आजच्या ठाणे वृत्तान्तसोबत श्री. आनंद प्रकाश परांजपे यांचे मतदारांना आवाहन करणारी चार पानी पुरवणी  देण्यात आलेली असून ती ‘दी इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’च्या मार्केट सोल्यूशन्स टीमच्या पुढाकाराने जाहिरातदारांनी ‘जाहिरात’ म्हणून प्रकाशित केली आहे.