कार्यालयात सातत्याने खणखणणारा दूरध्वनी.. समोरून प्रश्नांचा भडिमार.. त्याच्या प्रश्नांचे केले जाणारे समाधान.. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या शंकांचे केले जाणारे निरसन.. प्रचार साहित्याचे थकित देयक घेण्यासाठी ताटकळलेले मुद्रक. बाजूच्या खोलीत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न.. या वातावरणात मतदारांना देण्यात येणाऱ्या चिठ्ठीसाठी राबविण्यात येणारा प्रशिक्षण कार्यक्रम.. कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यात समन्वय राहावा यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेला प्रचार फलक.. या कोलाहलापासून अलिप्त राहून कार्यालय प्रमुखांचे सुरू असलेले नियोजनाचे काम.. शहरातील त्र्यंबक रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयात मंगळवारी असे चित्र पाहावयास मिळाले.
लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा वेग सर्वत्र वाढला आहे. या सर्व घडामोडीला ठक्कर बाजार बसस्थानकालगतचे मनसे कार्यालयही अपवाद ठरले नाही. कार्यकर्त्यांच्या घोळका समूहाने येतो. कामासंदर्भात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो. आज काय करायचे याची विचारणा होते. प्रचारासाठी मनुष्यबळ कसे जमवायचे, प्रचार साहित्याची खातरजमा करत निघून जातो. दुसरा जथ्था मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या फेरीच्या नियोजनात गर्क असतो. आमदार, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष आदींच्या उपस्थितीत नियोजित स्थळापासून फेरी सुरू झाल्यानंतर उर्वरित कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. मतदारांना देण्यात येणाऱ्या चिठ्ठय़ा इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या मदतीने कशा तयार केल्या जातात याचे प्रशिक्षण कंपनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होते. प्रात्यक्षिक सादर झाल्यावर कार्यकर्त्यांच्या शंका, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला. साधारणत: दीड तास हा वर्ग सुरू राहिला. त्याच वेळी इतर पदाधिकाऱ्यांनी कोणाला विभागनिहाय किती यंत्रे दिली गेली, रिळ दिले याच्या हिशेबाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू असते.
या दरम्यान नाशिकरोड येथील दोन महिला कार्यकर्त्यांचा वाद कार्यालयीन प्रमुख प्रदीप वझरे यांच्यासमोर मांडला जातो. बाजूच्या एका खोलीत शांतपणे वझरे, इतर पदाधिकारी आणि संबंधित महिलांबरोबर चर्चा सुरू राहते. त्याच वेळी वझरेंचा भ्रमणध्वनी अपुऱ्या प्रचार साहित्याच्या तक्रारीसाठी खणाणतो. उपलब्ध साहित्य कसे वापरायचे याबाबत मग त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. या वेळी मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १९ तारखेच्या जाहीर सभेची माहिती व्हावी, यासाठी प्रचार वाहनांची जमवाजमवीची तयारी सुरू असते. तोपर्यंत नाराज महिलांची समजूत काढली जाते. पुढील चौकसभेच्या नियोजनाच्या तयारीला सुरुवात होते. जाहीर सभेसाठी झेंडे, गळ्यातील पट्टय़ा, स्टिकर्स, पत्रके पुरेशा प्रमाणात आहेत की नाही याची छाननी सुरू असते.
या सर्व घडामोडीत आल्या-गेलेल्या कार्यकर्त्यांच्या शंकांचे समाधान, त्यांच्याकडील हालहवालाची चौकशी, त्यांचे चहापाणी याकडेही कार्यालयीन प्रमुखांचे लक्ष असते. दुपारी कार्यकर्त्यांच्या पेटपूजेचा विचार करून बाहेरील खाणावळीतून १५ ते २० डबे मागविले जातात. गरमागरम डबे आल्यावर मग विश्रांतीचा विचार होतो. संध्याकाळच्या बैठका, दिवसभरातील घडामोडींसाठी गप्पांची मैफल जमते. त्यानंतर पुन्हा शांतता.. प्रचार म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालयात सातत्याने वावर हा समज या ठिकाणी मोडीत निघतो. आपल्या शंका, अडचणी वरिष्ठांशी दूरध्वनीवरून विचारा, आवश्यकता असल्यास कार्यालयात येऊन चर्चा करा, मात्र काम झाल्यानंतर या ठिकाणी रेंगाळू नका हा अलिखित नियम येथील प्रत्येक जण कटाक्षाने पाळतो. कार्यालयात सध्या प्रचार साहित्यापासून मतदार याद्यांच्या गठ्ठय़ांचे ढीग आहेत. या शिवाय, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी नागरिकांचाही कार्यालयात वावर आहे. दुसरीकडे पक्ष कार्यालयात सर्व पातळीवर
कार्य सुरू आहे याची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी, यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘प्रचार फलक’ लावण्यात आला आहे. फलकावर उमेदवारांची फेरी कुठे असेल, त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्ती, इतर कार्यक्रम तसेच कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना याची माहिती दिली जात आहे.