जिल्हा परिषदेवर २००८च्या निवडणुकीत युतीचा झेंडा फडकविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या पाच सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे रिक्त आणि जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यवाहीत अपात्र ठरलेल्या शिवसेनेच्या महिला सदस्याच्या रिक्त अशा सहा जागांसाठी २३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे
२००८च्या निवडणुकीप्रसंगी राष्ट्रवादीचे जितेंद्र बिरारीस, रजनी घरटे, केदाबाई जाधव, भिवानी पवार हे साक्री तालुक्यातील आणि शिरपूरच्या सोनी पावरा यांनी युतीला मदत केली होती. युतीचा हा विजय काँग्रेस आणि पर्यायाने मित्र पक्ष राष्ट्रवादीच्याही जिव्हारी लागला होता. बंडखोर पाचही सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविले. याशिवाय शिवसेनेच्या रेखा ईशी यांनाही जातप्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यवाहीत अपात्र ठरविण्यात आल्याने या सर्व रिक्त जागी २३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. युतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर आघाडीने युतीच्या गोटातील नंदू भिल, विठ्ठल मोरे, कविता सोनवणे व नानाजी गायकवाड या चार सदस्यांना गळाला लावून सत्ता स्थापन केली होती. या चौघांनाही अपात्र घोषित करण्यात आले. परंतु औरंगाबाद खंडपीठात या चार सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय झालेला नाही.