विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत आपले निवडणूक चिन्ह पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या लागलेल्या स्पर्धेमध्ये उमेदवारांनी निरनिराळे मार्ग अवलंबले आहेत. आचारसंहितेच्या हातोडय़ामुळे या मार्गाना सामाजिक हिताचे नाव देऊन मतदारांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न पनवेलमध्ये जोरदार सुरू आहे. कागदी लगद्यापासून बनलेल्या पिशव्या पर्यावरणाची हानी करणार नाही, असा संदेश लिहून प्लस्टिक बंदीसाठी एका राजकीय पक्षाने घरोघरी पिशव्यावाटपाला सुरुवात केली आहे. या पिशव्या रिकाम्या नाहीत. त्यामध्ये पनवेलचा विकास केल्याचा दावा असलेली एक पुस्तिका आहे. दारावरची घंटा वाजवून काही महिलांचा ताफा  पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही पिशवी घराघरांत वाटत आहेत. आपल्या उमेदवाराची प्रतिमा किती स्वच्छ आहे असा त्या प्रचार करीत आहेत.     
पनवेलमधील सव्वाचार लाख मतदारांपैकी २ लाख ९१ हजार ६२४ मतदार शहरांमधील आहेत. त्यामुळे या उमेदवाराने शहरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हा मार्ग निवडला आहे. पनवेलच्या ग्रामीण परिसरात सुमारे सव्वालाख मतदारवर्ग राहिल्याने शहरी भागातील एक गट्टा मतदार मिळतील या अपेक्षेने कोणतेही सरकारी कारण नसताना हा पर्यावरणाचा जागर घरोघरी मोफत पोहचवला जात आहे.आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घरोघरी पिशव्यावाटप केल्याचे समजल्यावर पनवेलच्या
तगडय़ा स्पर्धकाने महिलांच्या उपस्थितीवर भर दिला आहे. या उमेदवारांच्या कार्यालयामध्ये सायंकाळचे चार तास कार्य करणाऱ्या महिलांना १५० रुपयांचे मानधन मिळत असल्याचे समजते. या उमेदवाराने शहरी प्रचाराला महत्त्व देत विविध वसाहतींमधून निघणाऱ्या प्रचार फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
नवीन निवडणूक चिन्हाची ओळख करून देण्यासाठी सध्या घरघरांत छापील पत्रे वाटली जात आहेत. महिलांना घरामध्ये बसण्याऐवजी मिळणाऱ्या आर्थिक मानधनामुळे उत्साहाने काही महिलावर्ग यामध्ये सामील होत असल्याचे समजते.