महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी राजीव गांधी भवन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असताना खबरदारी म्हणून ठिकठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे नाशिककरांची कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. शरणपूर रस्त्यावरील बँका, विविध आस्थापना व कार्यालयांनादेखील त्याचा फटका सहन करावा लागला.
अतिशय चुरस निर्माण झालेल्या या निवडणुकीत काहीही घडू शकते, हे लक्षात घेत पोलीस यंत्रणेने बंदोबस्ताचे नियोजन केले होते. पालिकेच्या सभोवतालचे रस्ते अशा निवडणूकप्रसंगी वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात, परंतु यंदा नेहमीपेक्षा बऱ्याच अंतरापासून हे रस्ते बंद ठेवण्यात आल्याने सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
सकाळी ७ वाजेपासून या परिसराचा ताबा पोलीस यंत्रणेने घेतला. पालिका मुख्यालयात ओळखपत्र असल्याशिवाय कुणाला प्रवेश नव्हता. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पालिकेच्या जवळपास फिरकू नये म्हणून सीबीएसकडून जाणारा रस्ता मेळा स्थानकालगत, तर याच मार्गावर पुढे राका कॉलनी चौकात लोखंडी दुभाजक टाकून रस्ता बंद करण्यात आला. याशिवाय जलतरण तलावाकडून पालिकेककडे येणारा तसेच केटीएचएम महाविद्यालयासमोरून पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्ते बंदचा फटका बसेस, खासगी वाहनधारक व रिक्षाचालकांना सहन करावा लागला. ज्या नागरिकांना शरणपूर रस्त्यावरील बँक वा इतर आस्थापनांमध्ये जावयाचे होते, त्यांना आपली वाहने या क्षेत्राच्या बाहेर उभी करून पायपीट करावी लागली. त्यातही ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद झाले, तिथे काही काळानंतर वाहने उभी करण्यास जागा शिल्लक राहिली नाही. यामुळे वाहनधारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.