देशाच्या आर्थिक राजधानीत राहत असूनही आतापर्यंत विजेची जोडणीही न मिळालेल्या आरे कॉलनीतील पाच आदिवासी पाडय़ांतील ३६७ घरांमध्ये गुरुवारची रात्र प्रकाशमय झाली. बाजूच्या पाडय़ांमध्येही लवकरच वीज येण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्याला ६७ वर्षे उलटून गेल्यावरही आणि महानगराच्या वेशीमध्ये असूनही आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनेक वसाहती अजूनही अंधारात आहेत. स्थानिकांची मागणी असूनही विविध परवानग्या आवश्यक असल्याने वीज येण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली. अखेर राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर रिलायन्स एनर्जीकडून पाच उपकेंद्रे बसवण्यात आली. यामुळे पहिल्यांदाच ३६७ घरांमध्ये मीटरमधून खांबाचा पाडा, मताई पाडा, गावदेवी, ओल्ड हिल क्वार्टर्स, न्यू हिल क्वार्टर्स, युनिट नं. १७, युनिट नं. ६, युनिट नं. ३२ आणि युनिट नं. २२ या भागांत वीज आली. या परिसरातील विद्युत वाहिनीचे जाळे टाकण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.  त्यामुळे लवकरच वाणीचा पाडा, युनिट १९ या ठिकाणीही वीज येऊ शकेल.