मुंबई शहर व उपनगरातील वीजदर मंगळवार १ एप्रिलपासून बदलल्याने आता घरगुती वीजग्राहकांसाठी ‘टाटा पॉवर’ स्वस्त आणि ‘रिलायन्स’ची वीज महाग हे समीकरणही बदलत आहे. ३०० युनिटपर्यंतच्या छोटय़ा वीजग्राहकांसाठी ‘टाटा’ची वीज स्वस्तच राहणार असली तरी दरमहा ३०० युनिटपेक्षा जास्त वीजवापर असलेल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत वीजग्राहकांसाठी आता ‘रिलायन्स’ची वीज स्वस्त ठरणार आहे. ‘टाटा’च्या तुलनेत ‘रिलायन्स’च्या ग्राहकांना दरमहा किमान १६१ रुपयांपासून ते ४२५ रुपयांचा लाभ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने २०१३ मध्ये जाहीर केलेल्या वीजदरांचा विचार करता सवलतीच्या वीजदराचे लाभार्थी असलेल्या छोटय़ा घरगुती ग्राहकांसाठी ‘टाटा पॉवर’ची वीज ‘रिलायन्स’च्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात स्वस्त झाली. पण त्याचवेळी वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला देणाऱ्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वीजग्राहकांसाठी मात्र समीकरण उलटे झाले. आतापर्यंत त्यांना ‘रिलायन्स’ची वीज महाग आणि ‘टाटा’ची स्वस्त होती. आता १ एप्रिलपासून नवे दर लागू होताच या ग्राहकांना ‘टाटा’च्या तुलनेत ‘रिलायन्स’ची वीज स्वस्त ठरणार आहे.
दरमहा ३०१ ते ५०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘टाटा’चा वीजदर आताच्या सहा रुपये २५ पैसे प्रति युनिटवरून सात ३१ रुपये इतका महाग होत आहे. तर ‘रिलायन्स’चा वीजदर नऊ रुपये १२ पैसे प्रति युनिटवरून थेट सहा रुपये ४६ पैसे प्रति युनिट इतका कमी होत आहे. परिणामी उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांना ‘टाटा’च्या तुलनेत ‘रिलायन्स’ची वीज दरमहा २५६ रुपये ४२५ रुपयांनी स्वस्त पडणार आहे. तर ५०० युनिटपेक्षा अधिक वीजवापर असणाऱ्यांना रिलायन्सची वीज दरमहा किमान १६१ रुपयांनी स्वस्त ठरणार आहे.