शहरातील गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन, सावरकरनगर यांसह पंचवटीतील औदुंबरनगर, लक्ष्मीनगर परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. या प्रकाराने ग्राहक त्रस्त झाले असून तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. याविरोधात नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात २ व ३ जून रोजी पहिला पाऊस झाल्यानंतर शहराच्या अनेक भागांत वीजपुरवठा १५ ते २० तास बंद होता. त्यानंतर आता गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन व सावरकरनगर परिसरात दररोज दर १५ ते २० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेचा अशा प्रकारचा लपंडाव पंचवटीतील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर, लक्ष्मीनगर या भागातही सुरू असतो.
या भागात तर दर शनिवारी बहुतांश वेळा सकाळी ११ ते सायंकाळी ६ असे अघोषित भारनियमन होत असते. यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रार करूनही सलग २४ तास सातत्यपूर्ण व योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. याची दखल घेत नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळ अधीक्षक अभियंत्यांना भेटणार आहे. शहरातील ग्राहकांनी यासंदर्भातील आपल्या तक्रारी ९४२२२६६१३३ किंवा ७५८८१०८८७८ या क्रमांकावर कराव्यात, असे आवाहन अनिल नांदोडे, विलास देवळे, कृष्णा गडकरी यांनी केले आहे.