नवी मुंबईत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामाची तयारी झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र हा दावा फोल ठरला असून पावसाच्या आगमनाबरोबरच ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखरणे, वाशी येथील काही विभागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणवर अनेक राजकीय, सामाजिक संघटना मोर्चा काढून अथवा निवेदन देऊन महावितरणच्या अधिकांऱ्यांना वीज ख्ांडित होण्याबद्दल जाब विचारत होते. यावेळी महावितरणचे अधिकारी मात्र मान्सूनपूर्व कामाची तयारी सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असून मान्सूनअगोदर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे उत्तर देत वेळ मारून नेत होते. मान्सून सुरू होण्याच्या एक आठवडाअगोदर ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी वाशी येथील महावितरण कार्यालयाला भेट देऊन वारंवार वीज खंडित होण्याबद्दल जाब विचारला होता. नवी मुंबईतील कोणत्या प्रभागामध्ये विद्युतवाहिन्या लोंबकळत आहे. विद्युत जनित्र खराब झाले आहे. याच्याबद्दल छायाचित्रासह माहिती देऊन एक आठवडय़ाभरात नवी मुंबईतील विभागवार पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितला होता. आज तीन आठवडे होऊनदेखील महावितरणकडून अहवाल सादर करण्यात आला नव्हता. पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने महावितरणाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या संदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता अरुण थोरात यांच्याशी संपर्क साधला असता कार्यकारी अभियंता एस.डी.सुरवाडे यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले. मात्र कार्यकारी अभियंता सुरवाडे याच्यांशी संपर्क  होऊ शकला नाही.