भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे राज्यस्तरीय सुवर्ण महोत्सवी अधिवेशन २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत येथे होत असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या बाबतची माहिती महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुवर्ण महोत्सवी अधिवेशन दिंडोरी रस्तावरील पुणे विद्यार्थी गृहाच्या देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयात होईल. २५ डिसेंबर १९६३ रोजी या महासंघाची स्थापना नाशिक येथेच झाली होती. त्यानंतर १९८८ साली रौप्य महोत्सवी अधिवेशनही नाशिकला झाले होते. आता पुन्हा २५ वर्षांनंतर महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन येथेच होत आहे. सुवर्ण महोत्सवी अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहेता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळेजी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात भारतीय मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष के. लक्ष्मा रेड्डी, उद्योग प्रभारी अख्तर हुसेन, के. के. हरदास, एस. एन. देशपांडे, आर. एन. पाटील, प्रभाकर बाणासुरे, हेमंत तिवारी, एल. पी. कटकवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून पाच हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून अनेक महत्वाचे ठरावही मंजूर केले जातील, असे देसाई यांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी नाशिकरोडच्या विद्युत भवन येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.