येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने १२ ते १४ जानेवारी या कालावधीत नवव्या मविप्र करंडक अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेचे यंदा नववे वर्ष आहे. स्पर्धेसाठी वेदना जाणवायला जागवु संवेदना, पंडित नेहरू-भारतीय राजकीय प्रतिभेचे अनोखे दर्शन, मन करा रे प्रसन्न, आम्ही गुलाम माध्यमांचे, भारत तरूण होतोय आणि साहित्य संमेलन रिकाम टेकडय़ांचा उद्योग हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेत कोणत्याही विद्या शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहभागी होता येईल. स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन माध्यमांसाठी खुली आहे. स्पर्धकाने कुठल्याही एका विषयावर एकुण ८ मिनिटे बोलता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. प्रत्येक महाविद्यालयास २ विद्यार्थ्यांचा संघ पाठवता येईल. संघासोबत एका संघ व्यवस्थापकालाही येता येईल. स्पर्धेच्या प्रवेशिका किंवा महाविद्यालयाचे पत्र ५ जानेवारीपर्यंत संपुर्ण माहितीसह प्राचार्याच्या सही शिक्काने महाविद्यालयाच्या कार्यालयात पोस्ट, फॅक्स किंवा ईमेल ने पाठवावे. भ्रमणध्वनीवर दिलेल्या मुदतीत पुर्व नोंदणी करता येईल. तसेच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणीसह स्पर्धेचा तपशील उपलब्ध आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या दोघा स्पर्धकांचे गुण लक्षात घेऊन सांघिक फिरता करंडक दिला जाईल. वैयक्तीक गटात अनुक्रमे प्रथम येणाऱ्या २१ हजार, द्वितीय क्रमांकास ११ हजार आणि तृतीय क्रमांकास ५ हजार तर उत्तेजनार्थ स्पर्धकास ११०० रुपयांची तीन पारितोषिके देण्यात येईल. स्पर्धे संदर्भात अधिक माहितीसाठी  डॉ. डी. पी पवार (९८८१४५१८६६), डॉ. पी. व्ही. कोटमे (९८५०७ ६०८६६) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले आहे.