राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विविध विभाग आणि अ‍ॅनॉकॉन उद्योगामध्ये ‘सामंजस्य सहचर्य’ (मेमोरेंडम ऑफ असोसिएशन) करण्यावर एकमत झाले. बुटीबोरीमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठी अ‍ॅनॉकॉन प्रयोगशाळा असून पर्यावरण आणि अन्न तपासणीचे काम मोठय़ा प्रमाणात या प्रयोगशाळेत होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच आरोग्य व स्वच्छतेच्या क्षेत्रात संशोधन व विश्लेषण करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही प्रयोगशाळा पार पाडते. विद्यापीठाबरोबरच्या सामंजस्य सहचर्यामुळे संशोधन किंवा प्रशिक्षणाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण, संयुक्तपणे कार्यशाळा किंवा अभ्यासक्रमांसाठी मदत होणार आहे. शिवाय विविध सुविधांच्या आदान-प्रदानाबरोबरच, उपक्रम किंवा प्रबंधावर काम करण्यासाठीही या सामंजस्य सहचर्याचा उपयोग होणार असल्याचे कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अ‍ॅनॉकॉनच्या डॉ. सुनंदा गार्वे आणि दत्तात्रय गार्वे उपस्थित होते.
एम. एस्सी. आणि एम.टेक.नंतर तीन किंवा सहा महिन्यांचे अभ्यासक्रम अ‍ॅनॉकॉन मार्फत घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेअरीबरोबरच प्रात्यक्षिक आणि कार्याचा अनुभव घेण्यास सोपे जाईल. अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने विचार केला जाईल. अ‍ॅनॉकॉनमध्ये सध्याच्या स्थितीत आठ कोटींचे भांडवल गुंतले असून एक कोटीपेक्षा जास्त किमतीची संशोधन साधने उपलब्ध आहेत. विद्यापीठाशी ‘एमओए’ करताना त्यांच्याकडून काही शुल्कही घेतले जाईल, असे दत्तात्रय गार्वे म्हणाले.  कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, अशाप्रकारच्या ‘एमओए’मुळे विद्यार्थ्यांना किमती साधने हाताळण्यास मिळतील तसेच विश्लेषण करण्याचीही संधी उपलब्ध होणार आहे. म्हणूनच रसायनशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, गृह विज्ञान, पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण शास्त्रांच्या विद्यार्थ्यांना या ‘एमओए’चा फायदा होईल. पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप कुंडल, मॉलेक्युलर बायलॉजीचे डॉ. टी. श्रीवासन, बीसीयूडी संचालक डॉ. अरविंद चौधरी उपस्थित होते.