इंद्रजीत याच्या सोबतच्या युद्धात लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर त्याच्यावरील उपचारासाठी हनुमानाने संजीवनी औपधीसाठी जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, त्याचाच एक तुकडा उरणच्या समुद्रकिनारी पडला त्यामुळे उरणच्या या डोंगराला द्रोणागिरी असे नाव पडल्याची आख्यायिका सांगीतली जाते. अरबी समुद्राच्या उरणकिनारी असलेल्या याच द्रोणागिरीच्या डोंगरामुळे उरण तालुक्याचे त्सुनामी, वादळीवारे आदीपासून सरंक्षण होत आहे. त्याचप्रमाणे येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये जाळण्यात येणाऱ्या गॅसपासून तयार होणारी काजळीसुद्धा अडविण्याचे काम याच डोंगरामुळे होत आहे. त्यामुळे उरणकरांसाठी संजीवनी ठरलेल्या या डोंगरावर अतिक्रमणे वाढू लागली असून येथील झाडांची कत्तल करून डोंगर बोडका करण्यात येत असल्याने द्रोणागिरी बचाव समितीच्या वतीने द्रोणागिरीचे संरक्षण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीती समितीने दिली आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील करंजा परिसरात द्रोणागिरीचा डोंगर आहे. करंजा या राज्यातील सर्वात मोठय़ा मच्छीमार बंदराचे ठिकाण असलेल्या या परिसरात द्रोणागिरी डोंगरावर येथील आगरी व कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले द्रोणागिरी देवी स्थान आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खासगी मालकांनी डोंगरीतील माती काढून टाकण्याचा प्रयत्न केला असताना मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या नेतृत्वात द्रोणागिरी बचाव समितीने तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे द्रोणागिरीच्या पायथ्याशी सुरू असलेले खोदकाम जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केले होते. मात्र सध्या या डोंगरावरील झाडांचा बेकायदा कत्तल करून त्या जागी प्लॉट पाडण्यात येत आहेत. याकडे येथील वनसंरक्षकांच दुर्लक्ष होत असल्याचे मत द्रोणागिरी बचाव समितीने व्यक्त केले आहे. या संदर्भात उरण वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत मराडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकाराची माहिती नस्ल्याचे सांगत, आपण स्वत: जाऊन याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वन विभागाने तातडीने कारवाई करून द्रोणागिरीवरील अतिक्रमणे न थांबविल्यास द्रोणागिरी बचाव समितीकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.