ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील ऐरोली-कोपरखरणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगमध्ये वडापाव आणि इतर खाद्यपदार्थाच्या गाडय़ांनी बिनदिक्कतपणे बस्तान मांडले आहे. त्यामुळे या पार्किंग नेमक्या जनतेसाठी आहेत, की खासगी व्यापाऱ्यांसाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. रेल्वे आणि सिडकोचे आधिकारी संगनमताने खाद्यपदार्थाच्या विक्रेत्यांना अभय देत आहेत. 

ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांची निर्मिती सिडकोने केली आहे. तर भविष्यातील रेल्वे स्थानकांतील वाढती गर्दी पाहता सर्व स्थानकांबाहेर दोन्ही दिशेला पार्किंग झोन उभारण्यात आले आहेत. एकीकडे हे पार्किंग झोन उभारण्यात आले असताना रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगलगतच मोकळ्या जागेत पदपथावर अतिक्रमण करीत खाद्यपदार्थाच्या विक्रेत्यांनी रस्ते गिळंकृत केले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना बसत आहे.
या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सुज्ञ नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनही सिडकोचे सुरक्षारक्षक आणि रेल्वे पोलीस या पार्किंग झोनमध्ये आमचा हस्तक्षेप नसल्याचे सांगत उडवाउडवी करत आहेत. सिडको मात्र पार्किंग झोनचे ठेके देऊन मोकळी झाली आहे. किमान आता तरी प्रवाशांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत ऐरोली आणि कोपरखरणे रेल्वे स्थानकांतील पार्किंग झोन अनधिकृत खाद्यपदार्थापासून मुक्त करण्याची मागणी होत आहे.

खाद्यविक्रेत्यांचे साहित्य, गॅस सिलिंडरचे पार्किंग
हार्बर मार्गावरील गर्दीचे आणि वर्दळीचे स्थानक असणाऱ्या ऐरोली आणि कोपरखरणे या ठिकाणच्या पार्किंगमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे खाद्यपदार्थाचे स्टॉल उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे पार्किंग कक्षात या खाद्यविक्रेत्यांचे साहित्य ठेवले जाते. तर पार्किंगच्या मोकळ्या जागेत गॅस सिलिंडर ठेवले जात आहेत. त्यामुळे पार्किंगमध्ये असणाऱ्या गाडय़ांचे पेट्रोल किंवा गॅस लिकेज होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते, परंतु याचे पार्किंगच्या नावावर पैसे गोळा करणाऱ्या ठेकेदाराला कोणतेही सोयरसुतक नाही. पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांच्या गराडय़ातून वाट शोधत पार्किंग करावी लागत आहे. तर कोपरखरणे रेल्वे स्थानकात पार्किंगबाबत विचारणा करण्यात आली असता, त्या ठिकाणी चक्क पार्किंगच्या झोनमध्ये वडा-पाव, दाबेली आणि शीतपेयांच्या गाडय़ा लागल्या आहेत.

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
ऐरोली रेल्वे स्थानकात ठाणे-बेलापूर मार्गानजिक असणाऱ्या पार्किंग झोनमध्ये संध्याकाळच्या वेळेला खाद्यपदार्थाच्या गाडय़ा ठेवल्या जातात. त्यामुळे सकाळी पार्क केलेली गाडी रात्री काढताना नाहक त्रास सोसावा लागतो.
डॉ. शाम यादव

कोपरखरणे रेल्वे स्थानकात पार्किंगमध्ये तीन गाडय़ा उभ्या आहेत. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला या गाडय़ांचा कचरा पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाडय़ांपर्यंत येतो. त्यामुळे ही पार्किंग नेमकी कोणासाठी आहे, असा प्रश्न पडला आहे.
राकेश मोकाशी