शिवकालीन नाणी..पेशवेकालीन नाणी..रिझव्‍‌र्ह बँकेचे शिक्के..विदेशी नाणी..नोटा..पितळ्याचे अडकित्ते..जुनी तिकीटे यांसह इतर अनेक दुर्मीळ वस्तू नाशिककरांना इंदिरानगरमध्ये पाहावयास मिळाल्या. त्यासाठी निमित्त ठरले अजय मित्रमंडळ आणि कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटम्स यांच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे.
या प्रदर्शनाचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांच्या प्रमुथ उपस्थितीत उद्घाटन झाले.
भारतीय इतिहास, परंपरा, संस्कृती जपण्याची आवड निर्माण व्हावी हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे अजय मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटम्सचे आजीव सभासद श्रीकांत वाघ यांच्या वडिलांच्या सिद्धेश्वर वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपल्याकडील पंरपरांचा वारसा पुढे नेता येत असल्याचा महापौरांनी उल्लेख केला. आपल्याला यातून आपल्या संस्कृतीची जाणीव होत असल्याचे मत त्यांनी मांडले. स्थायी सभापती व मनसेचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. ढिकले यांचेही भाषण झाले. या संस्थेचे अध्यक्ष अच्युत गुजराथी, संस्थेचे सचिव अ‍ॅड. राजेश जुन्नरे, कपिल पाठक आदी उपस्थित होते.
नगरसेविका डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी दुर्मीळ वस्तु जमा करून त्या जतन करण्यासाठी जिद्द व चिकाटी माणसाच्या अंगी असणे गरजेचे आहे. तरच असा सुंदर उपक्रम आपण राबवू शकतो असे नमूद केले. अजय मित्र मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी एकाच ठिकाणी आपल्याला प्राचीन व दुर्मीळ वस्तु बघण्यास मिळणे हे आपले भाग्यच असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन स्नेहल काळे यांनी केले. तर, अ‍ॅड. राजेश जुन्नरे यांनी आभार मानले.