रेल्वे खात्याच्या दृष्टीने मुंबई उपनगरी सेवा ही ‘सोन्याची कोंबडी’ आहे. तिच्यासाठी काहीही केले नाही तरी ती मरणार नाही याची रेल्वेला अगदी खात्री आहे. त्यामुळे अगदीच असह्य होईपर्यंत मुंबईत रेल्वे खाते फार काही करीत नाही. अर्थात प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांना सुखकर प्रवासाचे गाजर मात्र नियमितपणे दाखविले जाते. वातानुकूलित गाडी, सरकते जिने, सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या, १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढणार, कोकण रेल्वेचा प्रवास सुखाचा होणार, डहाणूपर्यंत उपनगरी रेल्वे जाणार, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू होणार.. अशा घोषणा आणि आश्वासनांची यादी खूप मोठी आहे. दरवर्षी रेल्वेमंत्री एक उपचार म्हणून अर्थसंकल्पात या प्रकल्पांचा उल्लेख करतात. आणि दरवर्षी मुंबईकर सरावाने ही आश्वासने फारशी मनावर घेत नाहीत. या पाश्र्वभूमीवर मागील रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी दिलेली पोकळ आश्वासने आणि केलेल्या फुकाच्या घोषणा यांची मंगळवारी संसदेत सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर ही झाडाझडती