कल्याण डोंबिवली महापालिकेतील लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तुद, शिपाई विलास कडू यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी दिली. नगरसेवक विद्याधर भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार शासनाकडे पाठवण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या गुरुवारी एका महिलेकडून अनधिकृत गाळा तोडू नये म्हणून नगरसेवक विद्याधर भोईर यांनी चार लाख रुपये लाच म्हणून स्वीकारले होते. ही लाच स्वीकारताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले होते. याप्रकरणी प्रभाग अधिकारी दत्तात्रय मस्तुद, विलास कडू या पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने पथकाने त्यांनाही अटक केली आहे. शुक्रवारपासून हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. सोमवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. ती पुन्हा दोन दिवसांनी न्यायालयाने वाढवली.

मस्तुदची मालमत्ता
उपअभियंता मस्तुदकडे पाऊण किलो सोने, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे येथे स्वत: व पत्नीच्या नावे आठ सदनिका आहेत. पावणेसहा लाखांची रोख रक्कम, एक होन्डासिटी गाडी, एक स्कूटर सापडली आहे. याशिवाय त्याच्या मूळ गावी काही मालमत्ता आहे का याचा शोध पथकाकडून घेतला आहे. ‘ब’ प्रभागाचा प्रभाग क्षेत्र अधिकारी घेताना सापडल्याने या प्रभागात प्रभारी अधिकारी नेमणे आवश्यक होते. सोमवारी याविषयी निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी सांगितले होते.