‘शिकण्याची आमचीही इच्छा आहे, पण पोटाची आग विझवताना ही इच्छा मारून टाकावी लागते. जुन्या पुस्तक विक्रीच्या व्यवसायातून शिक्षणाची आवड भागविण्याचा आम्ही प्रयत्न करतो.’ ही व्यथा कुण्या एकाची नाही, तर सीताबर्डी आणि महालमधील बुधवारी बाजारात जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या तरुण व्यावसायिकांची आहे. नागपुरात सुमारे ३० वर्षांपासून सीताबर्डी आणि महालमध्ये जुन्या पुस्तकांची विक्री केली जाते. हा वडिलोपार्जित परंपरेचा वारसा पुढे चालवणारी ही तरुण मंडळी आहे. यातील काहींनी केवळ प्राथमिक शिक्षण घेतले आहे तर, काहींचे माध्यमिक शिक्षण झाले आहे. यातील कुणीही पदवी घेतलेली नाही. तरीही गेल्या आठ-दहा वषार्ंपासून ते जुन्या पुस्तक विक्रीचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत.
वडिलोपार्जित हा व्यवसाय स्वीकारण्यामागील एक कारण म्हणजे व्यवसायातून मिळणाऱ्या फावल्या वेळात वाचनाची हौस भागवली जाते आणि यातूनच शिक्षणाचा आनंद मिळतो. फुटपाथवर जुन्या पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणारे हे तरुण व्यावसायिक, विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके ३० ते ४० टक्के दराने घेतात आणि ५० ते ६० टक्के दराने विकतात. यातून त्यांना फक्त दहा टक्के नफा मिळतो. कधीकधी ही पुस्तके थोडीफार फाटलेली असली की, त्याची डागडुजी करून मगच ती विक्रीला ठेवावी लागतात. त्यामुळे मग या १० टक्क्यांमधील ५ टक्केच हाती लागतात, असे सीताबर्डीवर जुन्या पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चाँदने सांगितले.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चाँदला पुढे शिकायची इच्छा आहे. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह ही प्राथमिकता असल्याने शिक्षणावर पाणी फेरावे लागते, असे तो म्हणाला. राज्य सरकारतर्फे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येत असल्याने आता या वर्गाना लागणाऱ्या पुस्तकांचा खप कमी झाला आहे. मात्र, अजूनही मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे. जुन्या पुस्तकांची खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने इतर शहरातून नागपुरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश जास्त आहे. या अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके घेणे परवडणारे नसल्यामुळे ही पुस्तके खरेदी करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांसोबतच उच्चवर्गीयांचेही तेवढेच प्रमाण असल्याचे सीताबर्डीवरील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. दिवसेंदिवस जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे, त्यासोबतच स्पर्धाही वाढते आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना कमीतकमी दरात चांगल्या स्थितीतील पुस्तके देण्याचा या व्यावसायिकांचा प्रयत्न आहे. बरेचदा हा व्यवसाय करताना पोलिसांचा अधिक त्रास होत असल्याचे स्वप्नील म्हणाला. पोलीस केव्हाही येतात आणि पुस्तके उचलून घेऊन जातात, अशावेळी दंड भरून पुस्तके सोडवून आणण्याशिवाय पर्याय नसतो. याशिवाय जेवढी पुस्तके पोलिसांनी उचलून नेली, तेवढी पुस्तके चांगल्या स्थितीत परत येतातच असे नाही. त्यामुळे अशावेळी नुकसान झाले तरी, तोंड बंद करून बसण्याशिवाय पर्याय नसतो.
उन्हाळ्यात उन्हाचा कडाका अधिक असला तरीही, पुस्तकांची विक्री याच मोसमात अधिक होत असल्याने अंगावर उन्ह झेलत, केवळ पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करावा लागतो.
याउलट पावसाळ्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागते. हा संपूर्ण व्यवसाय उघडय़ावर थाटला असल्याने बरेचदा पावसाचा फटका या व्यवसायाला बसतो. पाऊस काही सांगून येत नाही, त्यामुळे आवरासावर करेपर्यंत बरीच पुस्तके ओली होऊन जातात. अशावेळीसुद्धा मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागते. नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेल्या व्यापारी संकुलात या व्यावसायिकांना गाळे देण्यात आले आहेत पण, सुविधांचा अभाव असल्याने हे पुस्तक विक्रेते त्याठिकाणी जायला तयार नाहीत. फूटपाथसारखीच परिस्थिती त्या ठिकाणीसुद्धा असल्यामुळे ५० हजार रुपये त्या ठिकाणी भरण्याऐवजी फूटपाथवर व्यवसाय थाटलेला काय वाईट, असा या पुस्तक विक्रेत्यांचा सवाल आहे.