पर्यावरण हा पहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाशी संबंधित असलेला विषयाचे गांभीर्य उच्च शिक्षणातून हरवले असून ९९ टक्के महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवला जात नाही. मात्र, गुण विद्यापीठाला दरवर्षी पाठवले जातात.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्यावरण हा विषय ‘केजी टू पीजी’पर्यंत केवळ नावापुरता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रत्येक विद्याशाखेत पर्यावरण विषय शिकवला जातो. अगदी शारीरिक शिक्षण या विषयातही पर्यावरण विषय आहे. मात्र विद्यापीठात पदव्युत्तर विभागच नसल्याने हा विषय पदवीच्या दुसऱ्या वर्षांत शिकवला जातो. बीए, बीकॉम, बी.एस्सी, अभियांत्रिकी, गृहविज्ञान.. अशा नऊ विद्याशाखांमध्ये हा विषय केवळ नावालाच शिकवला जातो. वरिष्ठ महाविद्यालयांनाच या विषयासंबंधीचे प्रवेश करणे, पेपर काढणे, परीक्षा घेणे आणि गुण पाठवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यापीठाने केवळ निकाल जाहीर करायचा आहे. या विषयाचे गुण महाविद्यालयांतून पोहोचले नाहीत तर संबंधित अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होण्यास विद्यापीठाला विलंब होतो. शिवाय केवळ नियमित विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बहि:शाल विद्यार्थ्यांनाही हा विषय द्यावा लागतो. महाविद्यालयांना त्यांचे वर्ग, पुस्तके, शिक्षक उपलब्ध करून द्यावे लागतात.
महत्त्वाचा विषय असतानाही विद्यापीठाशी संलग्नित ९९ टक्के महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवला जात नाही. तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि विद्यापीठ निकालही जाहीर करते. पर्यावरणाचा नेहमीच कैवार घेणारे भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्येष्ठ विधिसभा सदस्य डॉ. श्रीराम भुस्कुटे म्हणाले, आमच्याकडे पर्यावरण हा विषय शिकवला जातो आणि त्याचे नियमानुसार पेपरही घेतले जातात. शिवाय हे पेपर पाच वर्षे जपून ठेवतो.
पर्यावरणाचे धडे देणार कोण?
जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये पर्यावरण विषयासाठी शिक्षक नसल्याची बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये पर्यावरणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे आदेश दिल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यासंबंधी शाळांना सूचना दिल्या. सुरुवातीला या विषयाची पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर या विषयासाठी शिक्षक नसल्यामुळे विज्ञान विषयाच्या शिक्षकांवर हा भार आला. मात्र स्वतंत्र शिक्षक नसल्याने या विषयाचे अध्यापन व्यवस्थित होत नसल्याची बाब समोर आली. या संदर्भात शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पर्यावरण हा विषय शाळेत शिकवला जातो. मात्र यासाठी स्वतंत्र शिक्षक नाही. विज्ञान विषयाचे शिक्षक पर्यावरण संबंधी विद्यार्थ्यांंना माहिती देतात.