जे. जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कला पाहण्याची, याचबरोबर विविध ज्येष्ठ कलाकारांशी संवाद साधण्याची पर्वणी १६ ते २२ फेब्रुवारीदरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात मिळणार आहे. निमित्त आहे वार्षिक कलामेळय़ाचे. सध्या महाविद्यालयातील विद्यार्थी या कलामेळय़ाच्या तयारीत गढले असून, प्रत्येक विद्यार्थी काही तरी वेगळे दाखविण्याच्या प्रयत्नात आहे.
कला मेळाव्यात महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे, शिल्पकला आदींचे प्रदर्शन होणार आहे. याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, टेक्स्टाइल विभागाच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो हे या मेळय़ाचे विशेष आकर्षण असणार आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार ललिता लाज्मी या प्रमुख पाहुण्या म्हणून येणार असून, त्यांच्यासोबत गुलजार आणि श्याम बेनेगलही उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय सत्यशील देशपांडे, रुपाली देसाई, मुकुंदराज देव यासारखे कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके, व्याख्याने आणि कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी २५ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या कलावेध या चित्रकला स्पध्रेत सहभागी झालेल्या काही निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा यावेळी पार पडणार आहे.