उंचावर गेल्यानंतर खाली पाहाल तेव्हा जग हे नक्कीच सुंदर दिसेल. एव्हरेस्ट गिर्यारोहकांना ही शिकवण देतो आणि म्हणून एव्हरेस्टचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येकच गिर्यारोहक उत्सुक असतो. तरुणाईत एव्हरेस्टला नाही कवटाळता आले आणि २२ हजार ५०० फुटावरून परतावे लागले. पंचेचाळीशी ओलांडल्यानंतर पुन्हा एव्हरेस्टने साद घातली आणि पंचेचाळीशीतही त्याला कवटाळता आले नाही, पण एक दिवस नक्कीच ते शिखर गाठणार! एव्हरेस्ट शिखर मोहीम दोनदा अध्र्यावर सोडून परताव्या लागलेल्या बिमला नेगी देऊस्कर यांनी एव्हरेस्ट दिनानिमित्त लोकसत्ताजवळ त्यांच्या अनुभवांना वाट मोकळी करून दिली.
भारत आणि नेपाळ या देशांची महिलांची पहिली संयुक्त मोहीम १९९३ साली एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निघाली होती, तेव्हा बिमला नेगी देऊस्कर त्या मोहीमच्या सदस्य होत्या. तब्येतीच्या कारणाने त्यांना मोहीम अध्र्यावर टाकून परतावे लागले. त्यावेळी ४० महिलांमधून केवळ १० महिलांची वर्णी या मोहिमेकरिता लागली होती. केंद्र सरकारने १० जणांच्या या चमूवर सुमारे ८० लाख खर्च केले होते. ही मोहीम असफल झाल्यानंतर केंद्राने नंतर कधी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे स्वप्न अपूर्णच राहते की काय असे वाटले. त्याचवेळी निश्चय केला होता दुसऱ्यांदा हे शिखर गाठायचेच आहे. तब्बल २२ वर्षांनंतर तो योग जुळून आला. वयाच्या ४८व्या वर्षी पुन्हा एकदा ते शिखर सर करणे खरं तर कठीण होते. त्यामुळे एप्रिलच्या मोहिमेसाठी सप्टेंबरपासूनच तयारी सुरू केली. कदाचित निसर्गाला ते मान्य नसावे आणि २१ हजार ५०० फुटांवर पोहोचल्यानंतर नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने पुन्हा एकदा ही मोहीम अध्र्यावर सोडून परतण्यास भाग पाडले. मात्र, एव्हरेस्टचे स्वप्न अजूनही डोळयात आहे. चीनने लिखित स्वरूपात नाही, पण मौखिकरीत्या रॉयल्टी तीन वर्षे कायम ठेवणार असल्याचे सांगितल्याने एक आशेचा किरण अजूनही आहे. गिर्यारोहणाने खूप काही शिकवले आहे, पण अलीकडे या मोहिमेला पैशाच्या जंजाळात ओढले जाण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पैशाने प्रत्येक गोष्ट साध्य होत नाही. एवढे मात्र खरे की आता गिर्यारोहणासाठी लागणारी साधने अत्याधुनिक आणि सोयीची झाली आहेत. हवामानाची माहिती सातत्त्याने मिळत असल्याने गिर्यारोहकाला होणारा धोका कमी झाला आहे.

आज एव्हरेस्ट दिन
कमी वयात त्यानेही एव्हरेस्टचे शिखर गाठले आणि आता त्याहीपेक्षा कमी वयातल्या अवघ्या १४ वषार्ंच्या मुलीला यशस्वीपणे एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे गाठायला लावले. हैदराबादचा बी. शेखर बाबू याची कामगिरी जेवढी मोठी, तेवढेच त्याचे पाय जमिनीवर असल्याचे त्याच्याशी बोलताना जाणवले. निझामाबादमधील अवघ्या १४ वर्षांंच्या पूर्णा मालावतचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करणारे, तर पूर्णाचे शिक्षणही निवासी शाळेतले. योगायोगाने बी. शेखर बाबू यांना या शाळेतील विद्यार्थ्यांना साहसाचे धडे देण्याची संधी मिळाली आणि त्यादरम्यान त्यांना पूर्णा नावाचा हिरा सापडला. बी. शेखर बाबू याने जेवढी मेहनत स्वत:वर घेतली त्याहूनही दुपटीने मेहनत त्याने पूर्णावर घेतली. अवघ्या ५४ दिवसांत पूर्णाने एव्हरेस्टचे शिखर सर केले हे सांगताना त्याचाही ऊर अभिमानाने भरून आला.