‘तेजाचा उत्सव’ असलेल्या दीपोत्सवात फटाक्यांची आतषबाजी, रंगीत रांगोळी, फराळ आणि नव्या कपडय़ांनी रंग भरले आहेत. दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारे लक्ष्मीपूजन गुरूवारी होत आहे. या निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्ताचे औचित्य साधत अनेकांनी घरकुल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृहोपयोगी साहित्य, सोने-चांदी खरेदी करण्याकडे कल ठेवला आहे. व्यावसायिकांनी या निमित्ताने विविध सवलतींचा ग्राहकांवर भडीमार केला असून बाजारपेठेत कोटय़वधींची उलाढाल होत आहे. दीपावलीनंतर असलेल्या लग्नसराईच्या मुहूर्ताची त्यात भर पडली असून साऱ्यांच्या खरेदीच्या उत्साहाला उधाण आले आहे.गुरूवारी अमावस्येमुळे अंधारलेल्या नभांगणाला लक्ष्मीपूजना निमित्ताने रोषणाईचा साज चढणार आहे. घराघरात तसेच व्यावसायिक, दुकानदार, औद्योगिक वसाहतींमध्ये लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी झाली आहे. बाजारपेठेत शाडुमातीच्या लहान आकारातील आकर्षक मूर्त्यां दाखल झाल्या आहेत. साधारणत १०० रुपयांपासून या मुर्तीची सुरूवात आहे. प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडून मुर्तीला प्राधान्य दिले जाते. यासाठी भरीव व पोकळ या प्रकारात सराफ व्यावसायिकांकडून पूजा उपकरणांसह चांदीच्या तसेच चांदीचा वा सोन्याचा मुलामा असलेल्या लहान मोठय़ा आकारातील लक्ष्मी मुर्त्यां उपलब्ध करून दिल्या आहेत. यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी असे विविध प्रकारही आहेत. मात्र घरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीक मानत ‘त्वं ज्योतिस्तवं रविश्वन्दरो विधुदग्निश्च तारका, सर्वेषा ज्योतिषां ज्योतिर्दीपावल्ये नमो नम’ मंत्र उच्चारत तिची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनानंतर साऱ्यांनाच साईच्या लाह्य़ांचा प्रसाद देण्यात येतो. यंदा ही लक्ष्मी महाग झाली असून ३० रुपयांपासून पुढे ती उपलब्ध आहे. ‘प्लॅट’ संस्कृतीत केरसुणीरूपी असणाऱ्या लक्ष्मीचे अस्तित्व लोप पावत असतांना अनेकांनी नारळाला लक्ष्मीचे रुप देत तीची पूजा-अर्चना करण्यास प्राधान्य दिले आहे. महालक्ष्मीचा मुखवटा, किंवा देवीचे डोळे, नाक, असे साहित्य खरेदी करत नारळाला देवीच्या मुखवटय़ाचे रुप देत तिची पूजा काही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासुन केली जात आहे. मूर्तीचा विर्सजन विधी पाहता काहींनी लक्ष्मीची प्रतिमा असलेल्या धातुच्या मूर्तीना प्राधान्य दिले आहे.
व्यावसायिकांकडून या दिवसाचे सोने करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, फर्निचर, मोबाईल, वस्त्रे आदी वस्तुंवर १० ते ५० टक्के दराने आकर्षक सवलतींसह खास भेटवस्तुंचे नियोजन करण्यात आले आहे. सराफ व्यावसायिकांनी पुढील लग्नाचा काळ पाहता मजुरीवर सुटसह आकर्षक भेटवस्तूची बेगमी केल्याने महिला वर्गाने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत काही दागिन्यांची आगाऊ नोंद करून ठेवली आहे. काहींनी अगदी कमी किंमतीत गुंतवणुकीच्या दृष्टीने घरकुल नोंदविण्यास प्राधान्य दिले आहे. या सगळ्या धामधुमीत बच्चे कंपनीची ‘मामाच्या गावाला जाऊया’च्या धून मुळे अनेकांना गावी जाण्याचे किंवा दीपावलीच्या दोन-तीन दिवसाच्या सुट्टीत बाहेरील पर्यटन स्थळाला भेट देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.