लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाला गेल्या महिनाभरात इतक्यावेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत की आता एकाही परीक्षेची तारीख बदलायची म्हटली तर परीक्षा विभागाला कामाच्या दिवशीच्या ‘नो डेट्स अ‍ॅव्हेलेबल’ म्हणत रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी परीक्षा घ्यावी लागणार आहे. साधारणपणे परीक्षांचे वेळापत्रक ठरविताना काही शनिवार राखून ठेवावे लागतात. पण, विद्यापीठाकडे राखून ठेवलेले सातच्या सातही शनिवार वेळापत्रकातील सुधारणांमुळे ‘पॅक’ झाले आहेत. त्यामुळे वेळापत्रकात थोडे जरी पुढे (कारण परीक्षा प्री-पोन्ड म्हणजे मागच्या तारखेला घेता येत नाही) करण्याची वेळ आली तर ती परीक्षा थेट रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी ठेवावी लागणार आहे. मुंबई विद्यापीठ तर वर्षांला तब्बल ६०५ विविध परीक्षा घेते. या परीक्षा विद्यापीठाला १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्यांच्या काळात घ्याव्या लागतात. यंदा कधी नव्हे ते विद्यापीठातील कर्मचाऱ्यांबरोबरच संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लोकसभा निवडणुकीचे काम लागले आहे. त्यामुळे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत परीक्षा घ्यायच्या कशा, असा प्रश्न विद्यापीठासमोर उभा राहिला. प्रथम परीक्षा विभागाने १६, १७, २३ आणि २४ एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलून १९ आणि २६ एप्रिल आणि ३ आणि १० मे रोजीच्या शनिवारी ठेवल्या. त्यानंतर बऱ्याच महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावे लागणार असल्याने विद्यापीठाला पुन्हा एकदा २८ मार्च आणि १ एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. या परीक्षा ५ आणि १२ एप्रिलच्या शनिवारी ठेवण्यात आल्या. वारंवार वेळापत्रकात बदल करावे लागल्याने इतकी गुंतागुंत निर्माण झाली की काही परीक्षांच्या तारखांमध्ये तर ‘तारीख पे तारीख’ अशा पद्धतीने बदल करावे लागले. पण, आता एकजरी परीक्षा पुढे ढकलायची म्हटली तर ती चक्क सुटीच्या दिवशी ठेवावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

राखीव शनिवार संपले!
परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या तर अशा आयत्यावेळच्या परीक्षांकरिता विभागाने सात शनिवार राखून ठेवले होते. पण आता हे सर्व शनिवार संपले आहेत. त्यामुळे, आता एखादी मोठी परीक्षा पुढे ढकलावी लागली तर ती थेट रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ठेवावी लागेल.
पद्मा देखमुख, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ