एप्रिल महिना विद्यार्थ्यांबरोबरच ‘मराठी शाळां’साठीही ‘परीक्षेचा काळ’ ठरू लागला आहे. सध्याचे दिवस मराठी शाळांचा ‘टक्का’ घसरण्याचे आहेत. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात मराठी शाळांचे शिक्षक घरोघर जाऊन विद्यार्थी नोंदणीचे प्रयत्न करीत असतात. नेमक्या याच काळात लोकसभेसाठी मुंबईत मतदान होणार असल्याने मराठी शाळाचालक चिंतेत पडले आहेत. शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी आठवडाभर बाहेर गेल्यानंतर पटनोंदणीसाठी घरोघरी फिरायचे कुणी, असा प्रश्न शाळांना सतावतो आहे.

मराठी माध्यमातून शिकण्याकडे कल कमी होत असल्याने मराठी शाळांना आपली पटसंख्या टिकवायची तर वस्त्यांवस्त्यांमधून फिरून विद्यार्थी जमा करावे लागतात. परीक्षा १२-१५ एप्रिलला संपल्या की शाळा या नोंदणी योजनेचे नियोजन करते. हे काम शाळेला ३० एप्रिलला सुट्टी पडेपर्यंत सुरू असते, पण नेमक्या २४ एप्रिलला मुंबई, ठाण्यात मतदान होणार आहे. त्यासाठी किमान आठवडाभर तरी शिक्षक शाळेबाहेर असणार आहेत. त्यामुळे पटनोंदणीचे सर्व नियोजन कोसळण्याची भीती ‘मुंबई मुख्याध्यापक संघटने’चे अध्यक्ष आणि कांदिवलीच्या ‘हिल्डा कॅस्टॅलिनो मराठी शाळे’चे मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली.
रेडीज यांच्याबरोबरच उपनगरातील अनेक मराठी शाळांमध्ये पटनोंदणीसाठी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने विशेष मोहीम राबविली जाते. राज्य सरकारने शिक्षकांच्या मान्यतेचे निकष बदलल्यामुळे तर शाळा विद्यार्थी नोंदणी वाढविण्याला शाळा सर्वाधिक प्राधान्य देऊ लागल्या आहेत. शाळांची पटनोंदणी कमी झाली की शिक्षक अतिरिक्त ठरतात. मग अशा शिक्षकांना इतर शाळांमध्ये बदली दिली जाते. हे टाळण्यासाठी शिक्षकही पटनोंदणीच्या मोहिमेला हातभार लावतात. त्यासाठी काही विभाग शिक्षकांना वाटून दिले जातात. शिक्षक वस्त्यांमधून फिरून मुलांची माहिती जमा करतात. ‘पहिली ते पाचवीच्या स्तरावर पटनोंदणी मोहिमेचा फायदा होतो. आमची ३० ते ४० टक्के विद्यार्थी नोंदणी या माध्यमातून होते, असे बोरिवलीच्या ‘हरचंद लोखंडे विद्यालया’चे मुख्याध्यापक आशीर्वाद लोखंडे यांनी सांगितले.
हळदीकुंकूही नाही, नेतेही नाहीत!
पटनोंदणीसाठी शिक्षक झोपडपट्टय़ा, कामगार वस्त्या आदी ठिकाणी फिरून पालकांशी बोलतात. आपल्या शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम, कार्यक्रम, शिक्षणाचा दर्जा या विषयी माहिती देतात. काही शाळा तर पालकांकरिता हळदीकुंकवांचे कार्यक्रमही राबवितात. या शिवाय स्थानिक नगरसेवक, शिवसेनेचे शाखाप्रमुख यांच्या मदतीनेही विद्यार्थी नोंदणीचे प्रयत्न केले जातात. मुंबईतील ८० टक्के मराठी शाळांमध्ये सध्या हे विद्यार्थी नोंदणीसाठी या प्रकारचे उपक्रम घेतले जातात हे विशेष. पण निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने नेतेमंडळीही या कामासाठी उपलब्ध होणार नाही आहेत.