प्रत्येक  स्त्रीमध्ये ‘सुंदर मी होणार’ ही सुप्त इच्छा असते. या इच्छापूर्तीसाठी सौंदर्य प्रसाधनांचा मारा. ऐकीव सुचना, सल्ल्यांनुसार आहार- विहारावर नियंत्रण.. या चक्रात त्या आपले आरोग्य आणि नैसर्गिक सौंदर्य हरवून बसतात. ही बाब लक्षात घेऊन आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांना आरोग्य आणि सौंदर्य या विषयक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी २ ते ५ एप्रिल या कालावधीत खास महिलांना डोळ्यासमोर ठेवत ‘तन्मयी ब्युटी आणि हेल्थ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हे प्रदर्शन होईल. नोकरदार महिलांपासून गृहिणींपर्यंत, चिमुरडीपासून वृध्देपर्यंत विविध टप्प्यावरील- वयोगटातील महिलांना धकाधकीच्या आयुष्यात आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा, आपले आरोग्य कसे सांभाळावे, साध्या सोप्या पध्दतीचा अवलंब करत नैसर्गिक सौंदर्य कसे जपता येईल या संकल्पनेवर ‘तन्मयी’ची आखणी करण्यात आल्याचे आयोजक अश्विनी देशपांडे यांनी सांगितले. २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात शहरातील आरोग्य आणि सौंदर्य विषयक काम करणाऱ्या संस्था सहभागी होत आहे. आरोग्य तसेच सौंदर्य क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांची व्याख्याने दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आली आहे. त्यात वेगवेगळ्या सौंदर्य पध्दतीचा अवलंब करत सौंदर्य खुलविण्यासाठी ‘सुंदर मी होणार’, उंची वाढविण्यासाठी ‘घेऊ उंच भरारी’, थायरोयीडचा बागुलबुवा, आहार तज्ज्ञांच्या सल्लानुसार ‘खाऊन पिऊन व्हा बारीक’, कमी खर्चात मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवता येईल आदी विषयांवर व्याख्यान होणार आहेत.
आरोग्याशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत बदलत जाणारी जीम पध्दत, जीममधील वेगवेगळ्या पध्दती या विषयीही अवगत केले जाणार आहे. डॉ. यशपाल गोगटे, डॉ. रणजीत जोशी हे मार्गदर्शन करतील. प्रदर्शन ५ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणार आहे. प्रदर्शन सर्वासाठी खुले असून नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ८६००६ ३३३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.