पत्रकार हा समाजाचा डोळा असल्याने त्याच्याकडून चांगले लिखाण अपेक्षित आहे, असे विचार इतिहासाचे गाढे अभ्यासक व संशोधक डॉ. भा.रा. अंधारे यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने वरिष्ठ पत्रकार विजय पवार यांच्या ‘स्वातंत्र्य चळवळीत नागपूरच्या वृत्तपत्रांची भूमिका’ (१८८५-१९४७) या पुस्तकाचे लोकार्पण प्रतिष्ठानचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या हस्ते झाले. शंकरनगर चौकातील बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, लेखक विजय पवार, डॉ. सुश्मिता मिश्रा उपस्थित होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वृत्तपत्रे शहरातून निघायची. या वृत्तपत्रांना मोठमोठय़ा संपादकांची परंपरा लाभली आहे. वृत्तपत्र हे समाजाचा खऱ्या अर्थाने आरसा व डोळे आहेत. गांधीयुगात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. तो इतिहास सामान्यांना कळावा हा उदात्त दृष्टिकोन ठेवून लेखकाने केलेले लिखाण सर्वश्रेष्ठ आहे. पत्रकाराला आवश्यक असणारे ज्ञान आणि भूमिका आत्मसात करून लेखकाने अत्यंत तटस्थ, व्रतस्थ आणि नि:स्वार्थ वृत्तीने ग्रंथाचे लिखाण केले, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढय़ात वर्तमानपत्रांची भूमिका ही सजग प्रहरी आणि समाजजागृतीची होती. आज प्रत्येक क्षेत्रात मूल्यऱ्हास होत आहे. अशा स्थितीत लेखकाने जो काही वर्तमानपत्रांचा इतिहास सादर केला, तो स्तुत्य असाच आहे, असे गिरीश गांधी म्हणाले.  यावेळी पुस्तकाचे लेखक विजय पवार यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली.
डॉ. सुश्मिता मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. दीपक रंगारी यांनी संचालन तर राकेश कारेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायण शर्मा, ज्ञानेश्वर रक्षक, राजेश निंबाळकर, अर्चना पवार, प्रा. विजय बुधे, प्रा. दिवाकर चौधरी, अमर कोंडावार, प्रा. भूषण निकुरे, जिवंत शरण, मनोहर गौर आदी उपस्थित होते.