घाटकोपर येथून अपहरण करण्यात आलेला तरुण घरी परतून दोन दिवस झाले तरी पोलिसांना अद्याप त्यांच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेता आलेला नाही. त्याच्या पालकांनी दोन कोटी रुपयांची खंडणी दिल्यानंतरच त्याची सुटका झाल्याचे सांगितले जाते. मात्र महिनाभर प्रयत्न करूनही अपहरणकर्ते न सापडल्याने मुंबई पोलिसांवर नामुश्की ओढवली आहे. घाटकोपरच्या छेडानगर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचे १२ मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सहा पथके करत होती, पैशाच्या बॅगेत मायक्रोचीप बसवून पैसे देण्याची योजना आखण्यात आली होती, पण १२ एप्रिल रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ अपहणकर्त्यांनी या बॅगेतील पैसे स्वीकारून बॅग फेकून दिली. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढता आला नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.