जरीपटक्यामध्ये खंडणी मागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचा कुठलाही अंकुश नसल्याने या गुंडाची हिंमत वाढली आहे. या गुंडाच्या गुंडगिरीची या परिसरातील व्यापारी व छोटे-मोठे व्यवसाय करणांऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. जीवाचे बरेवाईट होण्याच्या भीतीने प्रत्येक व्यापारी व छोटय़ा- मोठय़ा व्यावसायिकांना परिसरातील गुंडांना खंडणी ही द्यावीच लागते. खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरांवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
जरीपटक्यातील दयानंद पार्क येथे पुरुषोत्तम उर्फ परशु मनोहरलाल बत्रा (३२), रा. बाबा हरदास धर्मशाळेजवळ, जरीपटका, या तरुणाचा १६ ऑक्टोबरला रात्री निर्घृण खून करण्यात आला. मिसाळ ले-आऊट येथे राहणाऱ्या लॉझर्स उर्फ आरिफ विनोद इमॅन्युअल व त्याच्या साथीदाराने हा खून केला. या घटनेनंतर जरीपटक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. परशु बत्रा आणि आरोपी लॉझर्स हे दोघेही बुकी म्हणून काम करायचे. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. लॉझर्स हा या भागात खंडणीही मागायचा. त्यामुळे त्याची या भागात चांगलीच दहशत
होती. त्याच्या अटकेनंतर खंडणीला आळा बसेल, अशी या भागातील व्यापारी व छोटय़ा- मोठय़ा व्यावसायिकांची अपेक्षा होती.
परंतु, या घटनेनंतर खंडणी मागणाच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. या भागातील गुंड व्यापाऱ्यांना खंडणी मागू लागले. खंडणी मागण्याच्या घटना दररोज घडू लागल्या. परशूच्या खुनानंतर दहशतीमुळे काही व्यापारी चुपचाप खंडणीही देऊ लागले. त्यामुळे खंडणीखोराचे वर्चस्व आणखी वाढू लागले आहे. नेहमीप्रमाणेच इंदोरा येथील उमेश प्रकाश मोटघरे याने गुरुवारी १० क्रमांकाच्या पुलाजवळ चायनिजचा ठेला लावला. सायंकाळी ६ वाजता पाचपावलीतील बेलीशॉप रेल्वे क्वॉर्टर येथील शंकर राजू कोटुरवार (३०) हा ठेल्यावर आला. त्याने एक प्लेट नूडल्स खाल्ले. त्याचे पैसे मागितले असता शंकरने ‘क्यो बे तू पहचानता नही क्या, हम इस एरियाके दादा है’ असे म्हणून खंडणीची मागणी केली. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. भांडण सुरू असल्याने परिसरातील नागरिक गोळा झाले. जमाव बघून शंकर कोटुरवार हा तेथून पसार झाला.
यानंतर उमेश मोटघरे याने जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून शंकर कोटुरवार याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. अनेकदा तक्रार करूनही पोलीस आरोपींना अटक करत नाही. त्यामुळे आरोपींची आणखी हिंमत वाढते आणि गुन्हे करतात. त्यामुळे खंडणी मागणाऱ्यांना त्वरित अटक करून या भागातील व्यापारी व छोटय़ा- मोठय़ा व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.