आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या लाखो साधु-महंतांच्या उदरभरणासाठी शिधा सामग्रीची सवलतीच्या दरात व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. देशातील अन्य तीन ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थात राज्य शासनामार्फत ही व्यवस्था केली जाते. यामुळे महाराष्ट्रातील कुंभमेळ्यात देखील ही तजवीज करावी, असा लकडा साधु-महंतांनी लावला होता. ही मागणी मान्य झाल्यास सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
कुंभमेळा हा साधु-महंतांचा उत्सव असल्याचे सांगत शासनाने व्यवस्थापकाची भूमिका स्वीकारल्यानंतर आता संबंधितांच्या वेगवेगळ्या मागण्यांवर सकारात्मकता दर्शविण्यात येत आहे. १४ जुलै २०१५ पासून ध्वजारोहणाद्वारे यंदाच्या सिंहस्थाला सुरुवात होत आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात कोणत्याही कारणास्तव साधु-महंत नाराज होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंतचे घटक दक्षता घेत आहेत. त्याचे प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आले. देशात हरिद्वार, उज्जन, अलाहाबाद यासह नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिक-त्र्यंबकेश्वर वगळता उर्वरीत तीन ठिकाणी साधु-महंतांची बडदास्त ठेवण्यात स्थानिक यंत्रणा आणि शासन कोणतीही कमतरता ठेवत नाहीत. इतकेच नव्हे तर, कुंभमेळ्यानिमित्त आलेल्या साधु-महंतांना आवश्यक अन्नधान्य, साखर, घासलेट व घरगुती वापराचा गॅसही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. यामुळे महाराष्ट्र शासनाने नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थात त्या स्वरुपाची व्यवस्था करावी, अशी मागणी साधु-महंतांकडून वारंवार केली जात आहे. नाशिक येथे वैष्णव पंथाचे तीन आखाडे तर त्र्यंबक येथे शैव पंथाचे दहा आखाडे आहेत. या आखाडय़ांचे शेकडो खालसे असून त्यातील लाखो साधु-संत सिंहस्थात येणार आहेत. संबंधितांच्या साधुग्राममधील निवास व्यवस्थेच्या जोडीला पुढे आलेल्या या वेगळ्या विषयावर शासकीय पातळीवर विचार केला जात आहे.
सिंहस्थासाठी २३७० कोटींचा आराखडा आधीच तयार करण्यात आला आहे. जसजशी घटीका समीप येत आहे, तसतसे त्यात काही आवश्यक ती अतिरिक्त कामेही समाविष्ट केली जात आहेत. साधु-महंतांच्या मागणीवरून प्रशासनाने साधु-महंतांची संख्या लक्षात घेऊन किती शिधा सामग्री लागेल याचा अंदाज बांधला आहे. त्यानुसार गहू ५९९० क्विंटल, तांदुळ २९०० क्विंटल आणि साखर ९०० क्विंटल लागू शकते. तसेच घासलेट ७.९२ लाख लिटर आणि २५ हजार घरगुती गॅस सिलिंडरची उपलब्धता सवलतीच्या दरात करावी लागणार आहे. गहू, तांदूळ आणि साखर सवलतीच्या दरात दिल्यास दोन कोटी चार लाख तर घासलेटसाठी तीन कोटी ४८ लाख आणि एलपीजी सिलिंडरसाठी ४४ लाख १२,५०० रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यात इंधनासाठी केंद्र सरकारला सवलतीच्या दरात उपलब्ध करण्याची विनंती करता येईल. हा भार केंद्राने न उचलल्यास तो राज्य शासनाला सहन करावा लागणार आहे. साधु-महंतांना कोणतीही उणीव भासू नये म्हणून शासनाने आधीच त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे पुढील काळात हा निर्णय झाल्यास सहा कोटी रुपयांची तजविज करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
शासनाचा खरेदी दर (रुपयात)
साधु-महंतांसाठी सवलतीच्या दरात करावयाची उपलब्धता
* गहू         २०६८ ( प्रति क्विंटल)               
                 २००   (प्रति क्विंटल)
* तांदुळ     २९१८ (प्रति क्विंटल)                
                 ३००   (प्रति क्विंटल)
* साखर     २८०० (प्रति क्विंटल)                
                  १३५० (प्रति क्विंटल)
* घासलेट    ६०     (प्रति लिटर)                
                   १६     (प्रति लिटर)
* एलपीजी सिलिंडर    ६३३.५० (प्रति सिलिंडर)            
                                   ४५७   (प्रति सिलिंडर)
साधु-महंतांच्या म्हणण्यानुसार इतर ठिकाणी सिंहस्थावेळी सवलतीच्या दरात अन्नधान्य व इंधन दिले जाते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचे संभाव्य अंदाज काढला आहे. त्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडण्यात आला आहे. सवलतीच्या दरात ही व्यवस्था पुरविण्यासाठी सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे.
– दीपेंद्रसिंह कुशवाह (जिल्हाधिकारी)
देशातील इतर तीन ठिकाणी साधु-महंतांसाठी सवलतीच्या दरात अन्नधान्य व इतर सामग्री उपलब्ध केली जाते. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थात शासनाने ही व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. नाशिकला सुमारे चार लाख तर त्र्यंबकेश्वरला दोन लाख साधु येणार आहेत. त्यांना अन्नधान्य, साखर, इंधन व गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे.
भक्तीचरण दास महाराज