विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना लागू करण्यात आलेल्या अडीच वाढीव चटई निर्देशांकाची (एफएसआय) अधिसूचना प्रसिद्ध होईल की नाही या संभ्रमात असलेल्या नवी मुंबईकरांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. राज्य सरकारने मंगळवारी या निर्णयाची अधिसूचना जाहीर केल्याने नवी मुंबईतील सुमारे चार लाख रहिवाशांना नवीन घरे मि़ळण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे नवी मुंबईतील आलबेला इमारतीपासून सुरू झालेला इमारत पुनर्बाधणीचा सिलसिला आता कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. सिडकोने बांधलेल्या आणि अल्पावधीत मोडकळीस आलेल्या इमारतींनी वाढीव एफएसआय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, ही गेली वीस वर्षांपूर्वीची मागणी राज्य सरकारने मागील आठवडय़ात मान्य केली. त्यासाठी नवी मुंबई पालिकेने दोन वर्षांपूर्वी पाठवलेल्या अडीच वाढीव एफएसआयच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मोहोर उठवली; मात्र त्यानंतर काढण्यात येणारी अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने नवी मुंबईकरांच्या मनात घालमेल सुरू होती. याअगोदर अनेक वेळा अशा निर्णयांची केवळ घोषणा कागदावर राहिल्याने रहिवासी विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. त्यामुळे सरकारच्या वतीने अधिसूचना निघण्याची गेली आठवडाभर वाट पाहिली जात होती. त्यात अगोदर या प्रश्नावरून थयथयाट करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांनी तलवारी म्यान केल्याने काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी अधिसूचना लवकर काढा, अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा दिला. त्यामुळे सरकारने सूत्रे वेगाने हलविली. त्यामुळे सिडकोनिर्मित सुमारे २६० इमारतींतील रहिवाशांची ही प्रतीक्षा अखेर संपली. वाशी येथील जेएनवन जेएनटू प्रकारातील इमारतीच्या रहिवाशांनी गेली अनेक वर्षे या नरकयातनेत काढलेली आहेत. अनेक इमारतींतील रहिवासी सानपाडा येथील संक्रमण शिबिरात राहत आहेत. ही घरे इतकी निकृष्ट आणि नियोजन अभावाची होती की या घरातून अंत्ययात्रा बाहेर काढताना शोकाकुल नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे निदान या घरांच्या पुनर्बाधणीचा प्रश्न सोडविण्यात यावा, असे साकडे सरकारला प्रत्येक वेळी घातले जात होते. सिडकोच्या या इमारतीच्या निकृष्ट कामांचा नमुना नंतर ऐरोली येथील लेक व्ह्य़ू, कोपरखैरणे येथील आकाशगंगा, नेरुळ येथील वैष्णवी, सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेजच्या घरातही दिसू लागला होता. सात-आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या खारघर येथील घरकुल योजनेतील घरांचीही दुरवस्था जाणवू लागली होती. त्यामुळे सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत होता. त्याला सरकारच्या या शेवटच्या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. प्रसिद्ध अभिनेते भगवान यांचे वाशी येथे दुकान असलेल्या पहिल्या इमारतीची दीड एफएसआयने पुनर्बाधणी झालेली आहे. हा सिलसिला आता अडीच एफएसआयने पुढे जाणार आहे. त्या पहिल्या इमारतीचे नाव ‘अलबेला’ ठेवण्यात आले आहे.

 गेली सात वर्षे शासनाकडे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो. आज ती मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या प्रस्तावाची अधिसूचना निघाल्याने सिडकोनिर्मित इमारतीतील रहिवाशांना मी दिलेला शब्द पाळला आहे. सिडकोबरोबरच खासगी धोकादायक इमारतींनाही हा निर्णय लागू व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे.
गणेश नाईक, पालकमंत्री ठाणे</strong>

धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या रहिवाशांना या निर्णयामुळे न्याय मिळाला असून पालिकेने या प्रस्तावाची चांगली तयारी केली होती. त्यामुळे शासनाला तो मंजूर करण्यात कोणतीही अडचण भासली नाही. या निर्णयामुळे शहराचा पुन्हा मेकओव्हर होणार असून रस्ते, पार्किंगसारखे प्रश्न सुटणार आहेत. पालिकेने यापूर्वीच मल आणि जल सुविधा वाढविलेल्या आहेत.
आबासाहेब जऱ्हाड, पालिका आयुक्त

हा निर्णय यापूर्वीच झाला पाहिजे होता, पण ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणावे लागेल. वाशीतील जेएनवन जेएनटू प्रकारातील इमारतीच्या रहिवाशांनी बरीच सहनशीलता दाखविली. अखेर त्यांना न्याय मिळाला. या निर्णयामुळे नवी मुंबईतील घरांचे दर मात्र वाढणार आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी आपली घरे विकू नयेत, अशी विनंती आहे.
किशोर पाटकर, स्थानिक नगरसेवक

मुसळधार पाऊस पडला की घरातील मंडळींच्या छातीत धस्स होत होते. या भीतीखाली एक पिढी सरली. त्यामुळे या निर्णयाचे तसे काही सोयरसुतक नाही, पण आमच्या वाटय़ाला आलेली दु:खे भावी पिढीच्या वाटय़ाला येऊ नयेत म्हणून हा निर्णय स्वागतार्ह आहे. संक्रमण शिबिरात गेलेल्या रहिवाशांना सिडकोने खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे आता या निर्णयात कोणाचाही खोडा नको.    
 अशोक पालवे, सचिव, पंचरत्न सोसायटी, वाशी