गेल्या नऊ वर्षांपासून बारवी धरणातील नवी मुंबईच्या हिश्शाचे १४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली पालिकेला देण्याचा प्रश्न शासनाच्या जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहे. आघाडी शासनाने हा विषय गांभीर्याने न घेतल्याने कल्याण डोंबिवली पालिकेला मुबलक पाणीपुरवठा मिळण्यात अडचणी येत होत्या. विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लघू पाटबंधारे विभागाला १४० दशलक्ष लिटर पाणीसाठा कल्याण डोंबिवली पालिकेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याणचे भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी विधिमंडळात या पाणी प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले होते. या वेळी हा पाणीसाठा पालिकेला तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते. नवी मुंबई पालिकेला बारवी धरणातून नियमित १४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. मोरबे धरणातून नवी मुंबईला मुबलक पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नवी मुंबईच्या हिश्शाचे बारवी धरणातील १४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली पालिकेला वळते करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे केली जात होती. नवी मुंबईचे एक वजनदार प्रस्थ हा पाणीसाठा कल्याण डोंबिवलीला देण्यास तयार नव्हते. या वजनदार नेत्याचा प्रभाव आघाडी शासनात असल्याने १४० एमएलडी पाणी पालिकेला मिळण्यात अडचणी येत होत्या. हे पाणी नवी मुंबईऐवजी मीरा-भाइंदर या आपल्या लोकसभा मतदारसंघाकडे वळवण्यासाठी त्या नेत्याचे प्रयत्न होते, असे बोलले जाते.
विविध माध्यमांतून कल्याण डोंबिवली पालिकेला सुमारे अडीचशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा नियमित होतो. वाढीव पाणीसाठा उपलब्ध झाला तर पालिकेच्या अनेक भागांत असलेली पाणीटंचाई दूर होईल आणि २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावेत म्हणून आपण तगादा लावणार आहोत, असे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.