सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कासवगतीमुळे वैतरणा नदीवरील मोखाडा-कसाऱ्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रेंगाळले आहे. त्यामुळे पालिकेला सुमारे ७ कोटींचा भरुदड सोसावा लागला आहे. त्याशिवाय मुंबईकरांना मिळणारे ४५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पोहोचण्यासही विलंब होत आहे.
वैतरणा नदीवर मोखाडा आणि कसाऱ्याला जोडणाऱ्या रस्त्यावर हा पूल आहे. मात्र मध्य वैतरणा धरण पूर्ण झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसराचा संपर्कच तुटणार आहे. त्यामुळे तेथे एक पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर होती. तो मार्च २०११ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून खर्चही २३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा अतिरिक्त भारही पालिकेवरच पडणार आहे. त्यासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. या विलंबामुळे मध्य वैतरणा धरणातील अतिरिक्त पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यास विलंब होणार आहे.