राज्यात अश्व खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रोत्सवात फक्त २० इंच उंची आणि पाच वर्ष वय असलेला ‘मारिओ’ हा अश्व आकर्षण ठरला आहे.
दोंडाईचा येथील विक्रांत रावल यांच्या अश्व विकास केंद्रातील हा अश्व आहे. भारतात दुर्मीळ असलेल्या फैला-बैला जातीचा र्अजटिनास्थित मारिओ हा अश्व देखणा असून रंगाने लाल आहे. त्याच्या मानेवर लांब व झिपरे केस आहेत. पाणीदार डोळे, उंचीने लहान आणि शरीराने बलाढय़ असलेला मारिओ अश्व प्रेमीचे लक्ष वेधून घेत आहे. अश्व बाजारात येणारे हजारो तरुण मोबाईल व कॅमेऱ्यामध्ये मारिओची छबी टिपत आहेत.
फैला-बैला या जातीचे अश्व र्अजटिना, अमेरिका, स्वित्र्झलड, अफगाणिस्तान या ठिकाणी मुख्यतो आढळत असून त्यांचा बग्गी व हाऊस राईड म्हणून उपयोग केला जातो. अर्जटिना येथे या जमातीच्या घोडय़ाचा सुमारे दीडशे वर्षांपासून उपयोग केला जात आहे. या जातीतील पिलू १०२ सेंटिमीटर उंचीचे असते. या अश्वाांना भारतीय वातावरणाचा अजिबात त्रास होत नसून त्यांना खाण्यासाठी हिरवा चारा, पिण्यासाठी शुद्ध पाणी लागते, अशी माहिती रावल यांनी दिली.
रावल यांनी सुरूवातीला फैला-बोला जातीचा एक अश्व आणून भारतीय वातावरणाचा अंदाज घेत त्याचे पालन पोषण केले. त्यानंतर या जातीची मादी आणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अश्व विकास केंद्रात प्रजनन प्रक्रिया घडवून आणली. सध्या या केंद्रात या जातीचे १८ पेक्षा अधिक अश्व आहेत.
त्यात मारिओ हा भारतातील उंचीने सर्वात लहान अश्व आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांना अश्वांच्या विविध जातींची माहिती व्हावी म्हणूनच खास मारिओला यात्रेत आणण्यात आले आहे, असे रावल यांनी नमूद केले.