एप्रिल महिना सुरू झाला की, उरण-पनवेल तसेच रायगड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यात ग्रामदैवत तसेच कुलदैवतांच्या जत्रांना व यात्रांना सुरुवात होते. फुंडे येथील घुरबादेवीच्या यात्रेपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर जसखार येथील रत्नेश्वरी, करंजा येथील द्रोणागिरी, नवीन शेवे येथील शांतेश्वरी, कोप्रोली तसेच या यात्रांमध्ये देवींच्या यात्रेसोबत कुलदैवतांच्याही यात्रा भरविल्या जात आहेत.
यापैकी जसखार, करंजा तसेच नवीन शेवे या गावात देवींच्या यात्रा दोन दिवसांच्या असतात. यामध्ये एक दिवस यात्रा तर दुसरा दिवस हा पालखी सोहळ्याचा असतो. या यात्रा व पालखी सोहळ्यांसाठी जिल्ह्य़ासह मुंबई, ठाणे आदी ठिकाणावरूही भाविक येतात. तालुक्यातील बारा गावातील यात्रा एकाच दिवशी साजऱ्या केल्या जातात. यामध्ये गावातील गावदेवतांच्या या जत्रा होतात. या यात्रांमध्ये देवाला गावठी कोंबडय़ाचा मान देण्याचा तसेच नवसाला बोकडाचा मान देण्याची तसेच साशन काठय़ा नाचविण्याचीही प्रथा आहे. या यात्रांसाठी चाकरमानी मोठय़ा संख्येने या भागात येतात. मात्र या परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तसेच अनेक गावांचे गावपणच हरवल्याने गावात यात्रेनिमित्ताने होणारी स्थानिक नाटय़ कलाकारांची नाटकांची परंपरा बंद झाली आहे.