कल्याण पूर्व भागात असलेल्या भाल, वसार भागांत संरक्षक दलाच्या विमानांसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागांचे बनावट सातबारा उतारे दाखवून गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा घालणारी नवी टोळी या भागात कार्यरत झाली आहे. या भागात नव्या गृहप्रकल्पांची उभारणी करण्याच्या जाहिराती तयार करायच्या, त्यामाध्यमातून लाखो रुपयांच्या नोंदणी मिळवायच्या आणि प्रत्यक्षात प्रकल्पाची एकही वीट उभी करायची नाही, असे प्रकार या भागात सर्रासपणे सुरू आहेत. याच भागातील काही गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचे एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले असून विमानतळाच्या जागेचा सातबारा दाखवून अशा प्रकारे फसवणुकीचे बरेच प्रकार घडले असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कल्याण पूर्व भागातील भाल, वसार, मलंगपट्टी भागात स्वस्तात घर देत असल्याची जाहिरात करून ३३ नागरिकांकडून १ कोटी १८ लाख रुपये चार विकासकांनी जमा केले. दोन वर्ष उलटूनही घर मिळत नाही तसेच विकासकाच्या कार्यालयाला टाळे लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ३३ गुंतवणूकदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कल्याणमधील शितलानगरमधील राजेश ठाकूर या व्यक्तीस अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वलीपीर रस्त्यावरील श्रीकृष्ण इमारतीत सुनील पोटे, अनंत शेडगे, अमोल ठाकूर आणि राजेश ठाकूर यांनी विकासक कार्यालय थाटले होते. भाल, वसार भागांत स्वस्तात घर देत असल्याची जाहिरात त्यांनी केली होती.
३३ ग्राहकांनी घरासाठी १ ते ६ लाखांपर्यंत पैसे गुंतवले. दोन वर्ष होऊनही घर मिळत नाही. जागेवर जाऊन पाहिले तर तेथे इमारतीची पायाभरणीही झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अ‍ॅड. जनार्दन भोयरकर यांच्यामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाल, वसार पट्टय़ात संरक्षण दलाच्या विमानतळाची १६०० एकर जमीन आहे.
बाजूला वन विभागाची जमीन आहे. भूमाफिया या जमिनी आपल्या असल्याचा बनाव रचतात आणि खोटे सातबारा उतारे दाखवितात. या सातबारा उताऱ्यांची पडताळणी करून घेण्याचे काम प्रत्येक ग्राहकाचे असते. मात्र, शासकीय कार्यालयात खेटे कोण घालणार या विचाराने टाळाटाळ केली जाते आणि स्वतची फसवणूक ओढवून घेतली जाते, असे काही ग्रामस्थांनी सांगितले.