मेल एक्स्प्रेस गाडीचे तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने प्रवाशांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांचे सामान लुबाडणाऱ्या नऊ जणांच्या टोळीस कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून दीड लाखांच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी आलेल्या प्रवाशांवर ही टोळी लक्ष ठेवून असे. बिहार-उत्तरेकडे जाणाऱ्या गाडीचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना गाठून, आपले नातेवाईक रेल्वेत तिकीट तपासनीस आहेत म्हणून सांगून त्यांच्या कार्यालयात जाऊन तिकीटे हमखास मिळवून देतो, असे सांगून ही टोळी प्रवाशांचा विश्वास संपादन करत असे. त्या प्रवाशाला रिक्षाने धारावीला नेले जात असे. तेथे गेल्यावर टोळीतील अन्य सदस्य त्या प्रवाशाला मारहाण करून त्यांचे सामान लुबाडून सोडून देत असत. याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी सापळा रचून राजू पासवान (२२), वशिष्ठ पासवान (२३) या दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून धारावीमध्ये रेल्वे पोलिसांनी धाड घातली असता, तेथे संतोष पासवान (२०), नुनू पासवान (१९) आणि रमेश पासवान (३२) यांच्यासह आणखी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून बॅग, कपडे, रोकड आणि २१ मोबाइल असा सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.