शाळेत असताना सुटीत आईबरोबर शेतात मजुरी करण्यात संदीपचं बालपण गेलं. ग्रामीण भाग आणि गरिबीचं दुष्टचक्र कधीच संपणार नाही, असंच वाटत होतं. परंतु प्रगतीची मार्ग हा शिक्षणातून आहे, हा मंत्र त्याला सापडला आणि संदीप सीए बनला. जिद्दीची ही कथा आहे संदीप गुरव या तरुणाची. जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो हे संदीपने सिद्ध करून दाखवलेय. संदीप बारावीला रात्रशाळेतून राज्यातून पहिला आलेला होता.
मुंबई गुन्हे शाखेत पोलीस हवालदार असलेल्या गुरव यांचा संदीप हा मोठा मुलगा. नुकत्याच जाहीर झालेल्या सीए परीक्षेत तो उत्तीर्ण झालाय. देशातून सीएचा निकाल अवघा सव्वा आठ टक्के लागला आहे. त्यातही संदीपने यश मिळवले आहे. पण त्याहीपेक्षा ज्या परिस्थितीतून त्याने हे यश मिळवलेय ते कौतुकास्पद आहे.
संदीप हा मूळचा सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातला. त्याचे वडील मुंबईत पोलीस हवालदार, तर आई शेतमजूर. एरफळे गावातील ज्ञानोजीराव साळुंखे शाळेत त्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना तो शेतात आईबरोबर पेरणी करायला जायचा. शेतात मजुरी हेच त्याचं भविष्य बनणार होते. पण दहावीला त्याला फक्त ६० टक्के गुण मिळाले. थोडा आत्मविश्वास मिळाला. चांगलं भविष्य घडवायचं असेल तर मुंबईत जाण्याचा निर्णय त्याने घेतला आणि वडिलांकडे हट्ट केला. त्याचे वडील चंद्रकांत गुरव मुंबई पोलीस दलात हवालदार होते. पण मुंबईत घर नव्हतं. ते परळच्या शापूरजी  पालनजी झोपडपट्टीत राहत होते. मुलाच्या इच्छेखातर त्यांनी संदीपला मुंबईत आणलं आणि मावशीच्या आठ बाय दहाच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली. ग्रामीण भागातून केवळ ६० टक्के मिळालेल्या संदीपला कुठलंही महाविद्यालय प्रवेश द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे त्याने परळच्या आर. एम. भट कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. अनेक जण त्या घरात राहायचे. शिक्षणाचे वातावरण नव्हते. वडील दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे, तर आई आणि इतर भावंडे गावी असायची. मात्र संदीपने जिद्दीने अभ्यास केला. बारावीला क्लास लावायला पैसे नव्हते आणि कमी टक्क्यांमुळे खासगी क्लासेस प्रवेश देत नव्हता. शेवटी वडिलांनी कशीबशी ओळख काढून एका क्लासमध्ये प्रवेश मिळवून दिला. क्लासचे पूर्ण पैसेही भरता आलेले नव्हते. परिस्थितीची जाणीव ठेवून संदीपने जिद्दीने अभ्यास केला आणि बारावीला त्याला ८० टक्के गुण मिळाले. रात्रशाळेतून तो राज्यातून पहिला आला. याच वेळी त्याने बँकिंगक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
संदीपच्या यशाची बातमी वाचून त्याला चुनाभट्टी येथील सरकारी अपंग संस्थेच्या सुधा मेहेर यांनी सायनच्या एसआयईएस महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. संदीप मेहनत करत होता. बारावीनंतर त्याने बँकिंग आणि ओरिएन्टेशनचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवली. मशीद बंदर येथील गाला अ‍ॅण्ड गाला फर्ममध्ये उमेदवारी केली. नेटाने अभ्यास केला आणि सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला. सीए पास झाल्यावर वडिलांनी त्याला आपल्या कार्यालयात नेले. त्या वेळी त्याच्याकडे नवीन कपडे नव्हते. त्यामुळे संदीपने मित्राकडून शर्ट मागून घेतले होते. ही बाब समजताच एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला नवीन कपडे घेऊन दिले होते.
बारावीनंतरच मी सीए होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तयारी सुरू केली होती. मी मेहनत करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. त्यामुळे भाषेची अडचण दूर झाली. मेहनत आणि अभ्यास हाच पर्याय माझ्यापुढे होता, नाहीतर माझं आयुष्य पुन्हा शेतात राबण्यात गेलं असतं असे संदीपने सांगितलं.
सुहास बिऱ्हाडे, मुंबई