शेतात बी पेरणारा.. कापणी करणारा.. झाडांवरून फळ काढणारा.. शेतकरी नेहमी आपण पाहतोच. पण ही सर्व कामे रोबो करतोय हे पाहण्याची अनोखी संधी नुकतीच ‘आयआयटी’मध्ये मिळाली. निमित्त होते ‘मुंबई आयआयटी’च्या पवई संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ई-यंत्र रोबोटिक्स स्पध्रेचे.
या स्पध्रेला यंदा ‘शहरी शेतकरी’ अशी संकल्पना देण्यात आली होती. त्याला अनुसरून येथे रोबोंची विविध रूपे सादर करण्यात आली होती. देशाच्या सकल स्थानीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा १५ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. देशातील कृषी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन ही संकल्पना देण्यात आली होती. शेती करताना पेरणी, कापणी, खुरपणी, खत घालणे अशा विविध क्रिया करण्यात येत असतात. या प्रकारांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना सध्याची कार्यपद्धती तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक विकसित कशी करता येऊ शकते, असे रोबो विकसित करण्यास सांगण्यात आले होते, ई-यंत्र प्रकल्पाचे प्रधान संशोधक प्रा. कवी आर्य यांनी स्पष्ट केले.
शेतीच्या विविध कार्यपद्धतींप्रमाणे स्पध्रेत विविध विभाग करण्यात आले होते. यातील बी पेरणाऱ्या रोबो या प्रकारात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, के. जे. सोमैय्या, बीट्स पिलानी या महाविद्यालयांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार पटकाविला. तर तण वेचण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या रोबोच्या विभागात धर्मसिंह देसाई विद्यापीठ, आर. व्ही. महाविद्यालय यांनी पारितोषिक मिळविले. खते विभागात के. जे. सोमैय्या, डी. वाय. पाटील आणि जवाहरलाल नेहरू या महाविद्यालयांनी बाजी मारली.
या स्पध्रेत सहा हजारहून अधिक विद्यार्थी देशभरातून सहभागी झाले होते. या स्पध्रेमुळे विद्यार्थ्यांना शेती विषयातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यास विचार करण्यासाठी वाव मिळाल्याचे मत ई-यंत्र प्रकल्पाचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सरस्वती कीर्तीवासन यांनी स्पष्ट केले. या स्पध्रेतील विजेत्यांना उन्हाळी सुटीत आयआयटी मुंबईत इंटर्नशीप करण्याची संधी मिळणार आहे.