विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात आणखी तीन शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत हा आकडा ६७१ पर्यंत पोहोचला आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील बोरगाई येथील शेतकरी कैलास दुधाडे, वर्धा जिल्ह्य़ातील वेला येथील ओमदेव सुपारे आणि सिरसगाव येथील अशोक खाकाते हे अलीकडील काळातील बळी ठरले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे विदर्भातील लाखो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून हजारो एकर जमीन खरडून गेली आहे. अशा जमिनीत पुढील काही वर्षे पीक येणार नाही, एवढे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या पंधरवडय़ात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू असताना विदर्भात १३ शेतक ऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्या.  विजयादशमी सणादरम्यान आठ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या. कापूस आणि सोयाबीन पिकांची अधिक क्षेत्र असलेल्या पश्चिम विदर्भातच अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. झालेल्या आत्महत्यांची सत्यता पडताळून पाहणी यंत्रणा अस्तित्वात नसताना प्रशासन या आत्महत्या अपघाती मृत्यू,   दारू पिण्याने किंवा घरगुती कारणाने झाल्याचे दाखवित आहे, असा आरोप समितीने केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अतिवृष्टी शेतक ऱ्यांना  आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्याच्या आश्वासनाचा दोन्ही सरकारांना विसर पडला आहे. राज्य व केंद्राकडून अजूनही शेतक ऱ्यांना मदत पुरविण्यात आलेली नाही.
सुरुवातीला विदर्भात झालेल्या नुकसानीमुळे कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे ५० टक्के नुकसान झाले होते. मात्र सोयाबीनला शेंगा व कापसाला बोंडे फुटल्यामुळे शेतक ऱ्यांना उत्पादनाची थोडी आशा होती. परतीच्या पावसाने विदर्भात १० लाख एकरामधील पिकांचे नुकसान केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टीग्रस्त विदर्भाचा दौरा केल्यानंतर जाहीर केलेली २ हजार कोटी रुपयांच्या मदतीतून एक पैसाही  आतापर्यंत शेतक ऱ्यांना मिळालेला नाही, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
विदर्भात झालेल्या आत्महत्या
वर्ष       आत्महत्या
२००१ –       ५२
२००२ –       ०४
२००३ –      १४८
२००४ –      ४४७
२००५ –      ४४५
२००६ –     १४४८
२००७ –     १२४६
२००८ –     १२६८
२००९ –       ९१६
२०१० –       ७४८
२०११ –       ९१८
२०१२ –       ९१६
२०१३ –       ६७१