नाशिकमधील बागलाण तालुक्यातील घटना
अवकाळी पावसात पीक भुईसपाट झाल्यामुळे हतबल झालेल्या बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. नैसर्गिक आपत्तीमुळे या आधी तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अलीकडेच सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात तब्बल १७ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग कोलमडला असून त्याचे प्रत्यंतर बागलाण तालुक्यातील घटनेने आले आहे.
बागलाण तालुक्यातील वनेरे गावात आत्महत्येची घटना घडली. लक्ष्मण आनंदा अहिरे (५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अहिरे यांची तीन एकर शेती आहे. पावसाने डाळिंब व कांदा रोपांची वाताहत झाली. दीड लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून सोमवारी रात्री अहिरे यांनी घरात किटकनाशक सेवन केले. रात्री ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मंगळवारी सकाळी कुटुंबियांच्या लक्षात आले. पण, तोपर्यंत अहिरे यांचे निधन झाले होते.
अहिरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. पावसाचा फटका पिकांना बसल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यामुळे ते आत्महत्येच्या निर्णयाप्रत आल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, अवकाळी पावसाचा अल्पभूधारक शेतकरी मोठा फटका बसला आहे. सातत्याने झालेल्या पावसाने खळ्यात ठेवलेले अन्नधान्य भिजवले, तसेच शेतातील पिकेही आडवी केली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले. या विभागाच्या प्राथमिक अहवालावरून नाशिक, इगतपुरी व पेठ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ३१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. निफाड उपविभागात ३०६ हेक्टर क्षेत्रावरील, कळवण उपविभागात ५८१७ हेक्टर तर मालेगाव उपविभागांतर्गत ८९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात सर्वाधिक ५८७० हेक्टरवरील भाताचे तर त्याखालोखाल ३३१० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे नुकसान झाले. ७०६ हेक्टरवरील द्राक्ष, १७१८ हेक्टरवरील तर ५७७ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. ५०० हेक्टरवरील भाजीपाला, कापूस ३८, हरबरा १५ तसेच १९६ हेक्टवरील उडिद पिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने अहवालात म्हटले आहे.